कातकरी आजही व्यवस्थेचा बळी....लोगो
(मालिका भाग ३ ः समाप्त)
स्थलांतरामुळे कातकरी समाजाच्या शिक्षणाची आबाळ
‘डाटा’ जमा करण्याची गरज ; दुष्टचक्र भेदण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी,ता. १८ ः वर्षाचे बारा महिने कातकरी समाज जंगलात आपल्या वस्तीत राहू शकत नाही. मजूर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलावले जाते. जमिनीची बांधबंदिस्ती, मंदिराची साफसफाई, कौल तोडणे, भातलावणी, भात कापणे आणि प्रामुख्याने बागा राखणे अशा कामांसाठी हा समाज जात त्यामुळे जंगलतोडीसह काही कामांसाठी त्याला आपल्या मूळ वस्तीपासून स्थलांतर करावे लागते. ते सहा महिने अथवा अधिकही असते. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अबाळ होते. परिणामी, शिक्षणाविना जी कमतरता राहते ती सर्व या मुलांच्या नशिबी येते. यातून दुष्टचक्र सुरू होते.
याबाबत या समाजाचे नेते चंद्रकांत जाधव म्हणाले, सेवासुविधा, शिक्षण यांचा अभाव असला तरी जीवशास्त्रीय प्रेरणा काम करतेच. त्यामुळे अल्पवयीन मुलांतही विवाह, लैंगिक व्यवहार होतात. त्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्याऐवजी तसे घडण्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. हे काम सातत्य, चिकाटी, त्या समाजातील लोकांचे साह्य घेतल्याविना शक्य नाही.
या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सुधारणा शिक्षणापासून सुरू करावी लागेल. जिल्ह्यातील या समाजाबाबत माहिती अद्ययावत हाती असावी लागेल. या समाजाबाबतचा पुढीलप्रमाणे डाटा गोळा करावा लागेल. जिल्ह्यात एकूण कातकरी समाजातील कुटुंबे किती, या कुटुंबात१ ते १८ वयोगटातील मुलगे मुली किती, यातील मुली किती अन् मुलगे किती, प्रत्येक मुलाचा जन्मदाखला आहे का, प्रत्येक मूल शाळेत जाते का, जात नसेल तर का नाही? प्रत्येक मुलाचे आधारकार्ड आहे का, मुलांचे शिक्षण थांबण्याची कारणे काय, सरकारदरबारी या मुलांची काय नोंद आहे म्हणजे आशावर्करकडे किंवा आरोग्यखात्यात काही नोंद आहे का? मुलांना कामाला, नोकरी अथवा रोजगारासाठी पाठवले जाते का? हा सगळा डाटा हाती आला की, कामाची दिशा ठरवता येईल. ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी कांबळे यांच्यासारखे संवेदनशील अधिकारी लाभल्यामुळे प्राप्त होण्याची चिन्हे आहेत, अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली.
---
चौकट
शिक्षण, पुनर्वसनची योजना
या समाजाची जिल्ह्यातील माहिती हाती आली की, यातील बालविवाहाला बळी पडू शकतील अथवा ज्यांचा बालविवाह होऊ शकतो, अशी बालके निवडून त्यांच्यासाठी शिक्षण, पुनर्वसन याची काही योजना तयार करता येईल. त्यांच्या पालकांचे समुपदेशन, त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना देणे. ते लोक स्थलांतरित होतात तेथील त्यांच्या मालकांशी संवाद साधून मुलांच्या शिक्षणाची हमी घेण्यासाठी त्यांना तयार करणे (असे काही मालक आहेत) असे काम करता येईल.
---
चौकट
शपथ वैगरे प्रतिकात्मक भाग
सध्या बालविवाह रोखण्यात प्रत्यक्ष काहीही काम न करता किंवा अल्पसे काम करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. बालविवाह झाले नाहीत म्हणून ग्रामपंचायतींची बक्षिसे मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. ज्या समाजात आणि जेथे बालविवाह अपवादाने घडतात तेथेही खटाटोप सुरू आहेत. या साऱ्यांसह बालविवाह रोखण्यासाठी शपथ वैगरे प्रतिकात्मक भाग झाला. त्यातच समाधान मानले तर मुख्य आवश्यक काम दूरच राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.