25424
कामातील सातत्याने वेंगुर्ले अव्वल
‘माझी वसुंधरा’; सलग तिसऱ्यांदा यश
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ : येथील पालिकेने सलग तिसऱ्यांदा ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत १५,००० पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यात शहराला रोख ७५ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून राबविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे हे साध्य झाले आहे.
माझी वसुंधरा अभियान पंचमहाभूतांवर आधारित असून या तत्वांच्या संवर्धनासाठी पालिकेकडून वर्षभर विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. भूमी या तत्वांतर्गत, शहरातील विविध भागांत ५,०३५ वृक्षांची लागवड करून हरित आच्छादनात लक्षणीय वाढ करण्यात आली.
सर्व प्रभागांमध्ये वृक्षगणना पूर्ण करून झाडांचे वैज्ञानिक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात आले. शहरात मियावाकी गार्डन विकसित करण्यात आले. तसेच बांबू, शेवगा आणि खस यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. पालिकेची रोपवाटिका उभारून स्थानिक स्तरावर रोपांची उपलब्धता निर्माण करण्यात आली. एकल वापर प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती मोहिमा, पथनाट्ये आणि विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यात आली. शहरातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या गांडूळखताला शासनाचे हरित मानांकन प्राप्त झाले आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
वायू तत्वांतर्गत सायकलिंग ट्रॅक तयार केला आहे. यातून पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यात आली. उत्सव काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारून हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यात आले. जल तत्वांतर्गत, शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविली आहे, ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग होऊ शकेल. शहरातील विविध भागात शोषखड्डे तयार करून भूजल पातळी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. गणेशोत्सव काळात जलप्रदूषण टाळण्यासाठी तीन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले. शहरातील सार्वजनिक विहिरींचा गाळ काढून त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले.
अग्नी तत्वांतर्गत, शहरात सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. शहरातील विविध भागांत सोलार हायमास्ट दिवे बसवून ऊर्जा बचतीला चालना देण्यात आली. अक्षय ऊर्जेबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. आकाश तत्वांतर्गत, पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, कांदळवन स्वच्छता मोहीम, शहरातील ई-कचरा संकलन मोहीम, स्वच्छ दिवाळी अभियान, मृदा दिवस आणि बीजबॉल कार्यशाळा यांचा समावेश आहे. याशिवाय पर्यावरणपूरक गणेश सजावट, भित्तीचित्र महोत्सव, किल्ले बांधणी स्पर्धा आणि एको-फ्रेंडली बाप्पा स्पर्धा यांसारख्या विवध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा तत्वांचे प्रतीकात्मक दर्शन घडविणाऱ्या रचना उभारल्या आहेत. या यशामध्ये नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, विशेषतः स्वच्छता कर्मचारी, पर्यावरण दूत धनश्री पाटील, ‘स्वच्छतादूत माझा वेंगुर्ला’ उपक्रमाशी संबंधित सदस्य तसेच सर्व नागरिकांचे मोलाचे योगदान आहे. माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अधिक प्रभावी नियोजन करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश प्राप्त करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली असून भविष्यातही हा लोकसहभाग कायम राहील, असा विश्वास नगरपरिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला.
..........................
कोट
हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. नगरपरिषद पुढील काळातही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना अधिक बळकटी देणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
- दिलीप गिरप, नगराध्यक्ष, वेंगुर्ले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.