पैसा बोलतो, आपण ऐकतो !.................लोगो
(१३ फेब्रुवारी टुडे ४)
पगार दुप्पट झाला तरी
खर्च तिप्पट हे समजून घ्या
एकदा का पैशाकडे आकड्यांऐवजी मूल्याच्या नजरेने पाहायला सुरुवात केली की, आर्थिक बातम्यांचाही अर्थ बदलतो. महागाई, व्याजदर, कररचना किंवा सरकारी खर्च हे शब्द अवघड वाटत नाहीत तर ते आपल्या खर्च करण्याच्या क्षमतेशी, बचतीशी आणि भविष्यासाठीच्या निर्णयांशी थेट जोडलेले वाटू लागतात. म्हणूनच अर्थसाक्षरतेचा पुढचा टप्पा म्हणजे पैसा ‘किती आहे’ यापेक्षा तो ‘काय करू शकतो’ याचा विचार करणं. ही भाषा समजली की, आर्थिक बदल गोंधळ निर्माण करत नाहीत; उलट, ते समजून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात.
- rat१९p१०.jpg-
२६O२५६०६
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
----
आपण रोज पैशाचे व्यवहार करतो, खर्च करतो, मिळवतो, बाजूला ठेवतो. तरीही पैशाकडे पाहण्याची आपली दृष्टी बहुतांशी आकड्यांपुरती मर्यादित असते. महिन्याला किती मिळालं, किती खर्च झालं आणि शेवटी किती उरलं एवढ्यापुरतं मोजमाप आपल्याला पुरेसं वाटतं. ही पद्धत चुकीची नसली तरी अपुरी आहे. कारण, पैसा केवळ आहे किंवा नाही एवढ्याच मर्यादित चौकटीत समजून घेतला तर अनेक आर्थिक बदल समजणं कठीण होतं.
अर्थशास्त्र पैसा वेगळ्या पद्धतीने मोजतं. ते पैशाच्या आकड्यांपेक्षा त्या पैशाच्या खऱ्या मूल्याचा विचार करतं. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार पाच वर्षांत दुप्पट झाला. ३० हजार रुपयांवरून ६० हजार रुपये झाला. वरवर पाहता ही मोठी आर्थिक प्रगती वाटते; पण त्याच काळात घरभाडं आठ हजारावरून २० हजार रुपये झाले, शिक्षणाचा खर्च तीन हजारावरून नऊ हजार झाला, आरोग्य आणि दैनंदिन गरजांचा खर्चही जवळपास तिप्पट झाला तर काय होतं? पगार दुप्पट झाला असला तरी खर्च तिप्पट झाल्यामुळे प्रत्यक्षात हातात उरणारी रक्कम वाढत नाही. अनेकवेळा ती कमीच होते. म्हणूनच आकड्यांनी पैसा वाढतोय हे खरं असलं तरी त्या पैशाची क्रयशक्ती वाढतेय का? हा खरा प्रश्न असतो.
इथेच पैशाची नाममात्र किंमत आणि खरी किंमत यामधला फरक समजून घेणं आवश्यक आहे. आकड्यांनी पैसा वाढू शकतो; पण त्या पैशातून विकत घेता येणाऱ्या वस्तू किंवा सेवा कमी होत असतील तर प्रत्यक्षात आपण आर्थिकदृष्ट्या पुढे जात नाही. आजचे हजार रुपये आणि दहा वर्षांपूर्वीचे हजार रुपये हा आकडा तोच आहे; पण त्यामागची क्रयशक्ती वेगळी आहे. हा फरक न कळल्यामुळे अनेकांना ‘उत्पन्न वाढतंय; पण दिलासा मिळत नाही’ अशी भावना येते.
बचतीबाबतही हेच लागू होतं. बँकेत पैसे सुरक्षित आहेत, ही भावना आपल्याला समाधान देते; पण त्या पैशांवर मिळणारा व्याजदर आणि वाढणारी महागाई यांची तुलना केली तर कळतं की, काहीवेळा बचत असूनही पैशाची खरी किंमत घटते म्हणजेच आकड्यांनी बचत वाढते; पण मुल्याच्यादृष्टीने ती तशीच राहते किंवा कमी होते. हे लक्षात घेणं म्हणजे पैसा मोजण्याची भाषा शिकण्याचा पुढचा टप्पा आहे.
या सगळ्यात जोखीम हा मुद्दा अपरिहार्यपणे येतो. बहुतांश लोक जोखीम म्हणजे धोका असं समजून ती टाळायचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र जोखीम टाळता येत नाही; तिचं फक्त व्यवस्थापन करता येतं. पैसा हातात ठेवणं, बँकेत ठेवणं, गुंतवणूक करणं या प्रत्येक पर्यायात वेगवेगळी जोखीम असते. प्रश्न जोखीम आहे का नाही, हा नसून कोणती जोखीम आपण स्वीकारतो आणि ती कशी संतुलित करतो हा असतो. म्हणूनच विमा, आपत्कालीन निधी, दीर्घकालीन गुंतवणुकीसारख्या गोष्टी जोखीम टाळण्यासाठी नाही तर अनिश्चिततेला सामोरं जाण्यासाठी असतात. अर्थसाक्षरता म्हणजे जोखीम नसलेले निर्णय घेणं नव्हे तर जोखीम समजून घेऊन तिचा परिणाम कमी करणारे निर्णय घेणं.
घरगुती बजेट करतानाही पैसा मोजण्याची हीच दृष्टी उपयोगी पडते. बजेट म्हणजे फक्त खर्च कमी करणं नाही. ते म्हणजे पैशाला दिशा देणं. कोणता खर्च आवश्यक आहे, कोणता पुढे ढकलता येईल आणि कोणत्या गोष्टींसाठी आधीच तरतूद करणं गरजेचं आहे हा विचार म्हणजे बजेटिंग. इथे काटकसरीपेक्षा जाणीवपूर्वक निवड महत्त्वाची असते.
पुढील लेखात आपण याच भाषेतील एक महत्त्वाची संकल्पना ‘महागाई आणि तिचं मोजमाप’ याबद्दल अधिक नेमकेपणाने पाहणार आहोत.
(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.