swt1922.jpg
25786
सिंधुदुर्गनगरी : येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा झाला.
युवकांनी समाजहितासाठी कार्यरत राहावे
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ः मुख्यालयात शिवजयंती दिमाखात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः शिवजयंती हा केवळ उत्सव नसून, स्वराज्याच्या संकल्पनेची पुनर्स्मृती आहे. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेत समाजहितासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी येथे ओरोस फाटा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला जिल्हाधिकारी धोडमिसे व पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसर ''जय भवानी, जय शिवाजी''च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि वातावरण शिवमय झाले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. अनंत डवंगे, मुकुंद चिलवंत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी शिवकार्य व शिवविचारांवर मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना रुजवताना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाला प्राधान्य दिले. त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य, संघटनशक्ती आणि धाडस हे प्रत्येक तरुणाने आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांचे विचार आपण आत्मसात करुन ते आचारणात आणणे आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनातही शिवचरित्रातील मूल्यांची अंमलबजावणी झाली, तर समाज अधिक सक्षम आणि सुदृढ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
समाजहितासाठी सदैव तत्पर राहा
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करताना स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठा यांची प्रेरणा आपल्याला मिळते. संकटांच्या काळातही धैर्य, दूरदृष्टी आणि युक्तीच्या बळावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. प्रजेचे कल्याण, स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव आणि शिस्तबद्ध राज्यकारभार यांवर त्यांनी भर दिला. ''शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'' हा संदेश देत त्यांनी प्रत्येक सामान्य माणसातील सामर्थ्य ओळखून संघटनशक्ती निर्माण केली. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपणही अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया, असेही श्री. दहिकर म्हणाले.
चौकट
लाठीकाठी, पोवाड्याने वातावरण भारावले
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच रानबांबुळी येथील शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन क्रीडा प्रकारांचे प्रभावी सादरीकरण केले. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी-काठी चालविणे यांसारख्या पराक्रमी कलांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सादर करण्यात आलेल्या पोवाड्याने वातावरण भारावून गेले. उपस्थितांनी या सादरीकरणाचे तोंडभरून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्य, शौर्य, संघटन आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.