बार कौन्सिलची २४ मार्चला निवडणूक
महाराष्ट्र, गोवा राज्यासाठीचा कार्यक्रम जाहीर; रत्नागिरीत १४०० मतदार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलची निवडणूक २४ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २६ फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र फिल्डिंग लावली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वसाधारणपण १४०० मतदार आहेत.
बारकौन्सिलच्या निवडणुकीसाठीचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे दोन्ही राज्यात मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी यापूर्वीच पायाला भिंगरी लावली आहे; पण, आता कच्ची मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाल्याने प्रचाराला अधिक गती आली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील वकिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे बार कौन्सिल कार्यरत राहते. त्यामुळे त्याच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर ५ वर्षांनी याची निवडणूक होते; मात्र, मुदत संपूनही कोरोना संकटामुळे या बार कौन्सिलची निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे लांबलेली निवडणूक आता होत असून, प्रक्रियेला वेग आला आहे.
बार कौन्सिलच्या प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर मतदार यादी तयार करताना १९९० नंतरच्या वकिलांची व्हेरिफिकेशन केली जाते. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये घेतले जाते. त्यामुळे मतदारयादी अंतिम करताना बराच वेळ गेला आहे. सुमारे १ लाख ५० हजारांवर मतदार यादीत समाविष्ट असतील, असे सांगितले जाते. अंतिम मतदार यादी समोर आल्यावरच नेमकी मतदार संख्या समजणार आहे.
चौकट
यंदा प्रथमच महिलांसाठी ३० टक्के आरक्षण
या निवडणुकीत २५ उमेदवारांची निवड पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेद्वारे केली जाते. यावर्षी प्रथमच ३० टक्के महिलांसाठी आरक्षण ठेवल्याने ७ महिला निवडून दिल्या जाणार आहेत. त्यातील पाच या निवडून येतील आणि २ नियुक्त केल्या जाणार आहेत तसेच १८ पुरुषांना संचालक मंडळात संधी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.