वेंगुर्लेत १४ मार्चला
राष्ट्रीय लोक अदालत
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्चला दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे अयोजन केले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरून लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवावयाचे असेल, अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे किंवा फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे दाखल करावीत, असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश तथा वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस. जे. चिवटे यांनी केले आहे.
-------
वेतोरेत उद्यापासून
दशावतार नाट्योत्सव
वेंगुर्ले ः वेतोरे येथील श्री देव सोमेश्वर मित्रमंडळ, खांबडवाडी २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान दशावतारी नाट्य महोत्सवाचे जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक यांच्या निवासस्थानानजीक आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २२) सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचे ‘सत्वपरीक्षा’, २३ ला पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, उभादांडा यांचे ‘प्रतिकृष्ण’, २४ ला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस दांडेली यांचे ‘ब्रह्मकुंड परिक्रमा’, २५ ला भाई कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचे ‘ययाती देवयानी’, २६ ला बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचे ‘कवडीमोल धन’, २७ ला चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचे ‘वेडा चंदन’, २८ ला संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन खांबडवाडी मित्रमंडळाने केले आहे.
.......................
माजगावात बुधवारी
वर्धापन दिन सोहळा
सावंतवाडी ः माजगाव गरड येथील श्री देव पाटणकर वस व श्री देवी अंबाभवानी मंदिराची चलप्रतिष्ठापना व शिखर कलशस्थापना सोहळ्याचा अकरावा वर्धापन दिन बुधवारी (ता. २५) साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी आठपासून गणपती पूजन, सर्व देवतांची पूजा, होमहवन, देवीयाग, अभिषेक, पूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, महागाऱ्हाणे, दुपारी १.३० ते ३.३० महाप्रसाद, दुपारी ४ वाजता सप्तशती वाचन, सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री ९ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------
वेंगुर्लेत दहावीची
बैठक व्यवस्था
वेंगुर्ले ः एस.एस.सी. परीक्षा-मार्च २०२६ ची केंद्र क्रमांक ८३०२ ची विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले येथे बी-०१९३५४ ते बी-०१९४५३ असे १०० विद्यार्थी, तर वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे बी-०१९४५४ ते बी-०१९६८० असे २२६ विद्यार्थी अशी केली आहे. बैठक व्यवस्थेची संबंधित शाळा, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. आपल्या क्रमांकानुसार संबंधित शाळेतील बैठक व्यवस्थेनुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षेस जावे, असे वेंगुर्ले परीक्षा केंद्र संचालकांनी कळविले आहे.
...........................
सरगवेत सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
दोडामार्ग ः सरगवे पुनर्वसन येथील देव खंडोबा, सातेरी, केळबाई, शंभू महादेव, म्हारिंगण पंचायतन देवस्थानचा २३ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (ता. २३) साजरा होणार आहे. सकाळी ९ वाजता सर्व देवतांचा महाअभिषेक, ११ वाजता सत्यनारायण व महापूजा, आरती तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन व रात्री १० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.