25946
शिवछत्रपतींची ‘सहिष्णुता’ अंगीकारा
मनोज सोनवलकर ः खांबाळेत शिवप्रेमी मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २० ः शिवछत्रपतींनी अठरा पगड जातींना एकत्र आणत स्वराज्य घडविले. ते रयतेचे, जनतेचे राजे होते. शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्यांचा कळवळा असलेल्या शिवछत्रपतींचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे मत पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी येथे व्यक्त केले.
खांबाळे येथील शिवप्रेमी मित्रमंडळ आणि मंगेश लोके मित्रमंडळांच्यावतीने केंद्रशाळा खांबाळे येथे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सोनवलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू, गुरुनाथ गुरव, संजय साळुंखे, मंगेश गुरव, लवू पवार, महेश चव्हाण, उमेश पवार, प्रवीण गायकडवाड, दीपक चव्हाण, अशोक पवार, विठोबा सुतार, दीपक पवार, जयेश पवार, सुनील पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, खांबाळे ते लोरे शिवपुतळा आणि तेथून पुन्हा कोकिसरे, वैभववाडी संभाजी चौक ते खांबाळे अशी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन गुरव समाजाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, ॲड. संजय देशमुख आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये खांबाळे आणि कोकिसरेतील असंख्य शिवभक्त सहभागी झाले.
----
शेतकरी, कष्टाळूंसाठी उल्लेखनीय कार्य!
श्री. सोनवलकर म्हणाले, ‘‘शिवछत्रपतींच्या युद्धनीतीचा जगभर अभ्यास केला जात आहे, परंतु केवळ युद्धनीतीच नाही तर शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम कुणीही विसरू शकत नाही. अठरा पगड जातींना एकत्रित आणून त्यांनी स्वराज्य घडविले. त्यांनी कधीही जातपात मानली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे.’’