कोकण

काजू बीला किलोला दीडशे रुपयांचा दर

CD

काजू बीला किलोला
दीडशे रुपयांचा दर
सावंतवाडी ः रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली असून, बाजारात काजू बी ची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन मर्यादित असले तरी, सुरवातीलाच काजू बियाला किलोला १५० ते १६० रुपये दर मिळत आहे, तर ओल्या काजुगराला किलोला १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. यावर्षी पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावली होती; मात्र पावसाने विश्रांती घेताच कडाक्याच्या थंडीला सुरवात झाली. थंडीतील सातत्यामुळे काजूपिकाला आवश्यक असलेले पोषक हवामान तयार झाले. यामुळे झाडांना मोहोर चांगला आला आणि फळधारणेची प्रक्रियाही वेगाने पार पडली. सध्या बागांमध्ये काजू तयार झाला असून, बागायतदारांनी पीक काढणीवर भर दिला आहे. काजूच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्या वर्षी काजूला चांगला बाजारभाव मिळाला होता. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच कच्च्या काजू बियाला प्रतिकिलो १५० ते १६० रुपये असा दर मिळत आहे.
-----
‘सीसीटीव्ही रेकॉर्डिंग
जतन करणे अनिवार्य’
रत्नागिरी : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होत असलेल्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य आणि विभागीय मंडळाने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, विभागीय मंडळाने सर्व परीक्षा केंद्रशाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्र संचालकांसाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत व रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २०) सुरू होणार आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राचा परिसर, परीक्षेशी संबंधित सर्व वर्गखोल्या, आयटी आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही (दिव्यांग विद्यार्थ्यांचा जादा वेळ विचारात घेऊन) रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------
पवित्र रमजान
महिन्याला सुरवात
सावंतवाडी ः जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सायंकाळी ‘मगरीब’च्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. रात्री शहर आणि परिसरातील सर्वच मशिदींमध्ये ‘तरावीह’च्या विशेष नमाजला सुरवात झाली. जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये पवित्र धर्मग्रंथातील पारे (अध्याय) वाचन सुरू झाले आहे. गुरूवारी पहाटे रोजेदार बांधवांनी सहरी केली. त्यानंतर पहिला रोजा सुरू झाला. रमजान महिना अत्यंत ‘बरकत’वाला असतो. या महिन्यात ३० दिवस रोजे ठेवण्याचा ‘आदेश’ आहे. रोजा या शब्दाला अरबी भाषेत ‘सौम’ म्हणतात, त्याचा अर्थ थांबणे असा होतो. सूर्योदय होण्यापूर्वीपासून सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे आणि शारीरिक गरजा न भागवणे ज्यामुळे सृष्टीचा पालनहार त्यावर खुश झाला पाहिजे. रोजा श्रीमंत आणि गरीब दोघांनाही ठेवावा लागतो. श्रीमंत व्यक्तीला रोजा ठेवल्यावर एक गरीब कसा राहत असेल याची जाणीव व्हावी हा सुद्धा दृष्टिकोन त्यामागचा आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरात रमजान महिन्याची जोरदार तयारी सुरू होती.
-----
स्त्यावरील तडे
लपवण्यासाठी
डांबराचे ‘पॅचवर्क’
चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मार्गताम्हाणे ते रामपूरदरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा अवघ्या काही महिन्यांतच उघड झाला आहे. नवीन रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून, ही दुरवस्था लपवण्यासाठी संबंधित विभागाने सिमेंटवर डांबराचे ‘पॅचवर्क’ करण्यास सुरवात केली आहे. काही महिन्यांपूर्वीच मार्गताम्हाणे ते रामपूर या पट्ट्यात कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता दीर्घकाळ टिकेल, अशी अपेक्षा होती; मात्र अल्पावधीतच रस्त्याचा पृष्ठभाग उखडण्यास सुरवात झाली असून, अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील हे तडे तांत्रिकदृष्ट्या दुरूस्त करण्याऐवजी त्यावर डांबराचा थर देऊन खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
----
पूर्णगड शाळेत
शिवजयंती
पावस ः तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रॅली काढून ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. विद्यार्थ्यांनी विविध लेझिम नृत्याचे विविध प्रकार सादर केले तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गीतगायन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उत्तम माहिती दिली, मनोगते व्यक्त केली.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT