जिल्हाधिकारी कार्यालयात
संत गाडगेबाबांना अभिवादन
रत्नागिरी ः स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी गाडगेबाबांच्या स्वच्छतामोहिमेचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्याचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि स्वच्छतेचा संकल्प या वेळी व्यक्त केला.
-----
रत्नागिरी जिल्ह्यात
सामूहिक गीतगायन
रत्नागिरी ः शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज रत्नागिरी जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सामूहिक गीतगायन करण्यात आले. नाचणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निबंध, चित्रकला व प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी त्यांनी गुरू तेग बहादूरजींचे बलिदान व कार्याची ओळख नवीन पिढीला करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मुख्य सोहळ्याची माहिती दिली. दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गायलेले गीत समूह स्वरूपात सादर करण्यात आले. या कार्यक्रमांना वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
कोंडगाव गणाच्या
सदस्यांचा सत्कार
संगमेश्वर ः तालुक्यातील कोंडगाव पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य विद्यासागर तांदळे यांचा भडकंबा नवालेवाडी ग्रामस्थांनी सत्कार केला. ग्रामस्थांनी दिलेल्या भरभरून सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो असून, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी तांदळे त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. या प्रसंगी शांताराम मावळणकर, माजी सरपंच प्रतीक्षा नवाले, दाजी नवाले, दीपक नवाले, बाळकृष्ण मावळनकर, शाखाप्रमुख जया बने, बंड्या केळकर, बाळा लोध, सचिन भिसे, बाळू शिंदे, राणू मोहिते, पारस साखरे, महेश राईन, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.