शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी शुक्रवारी ‘धडक’
किसान संघ ः सिंधुदुर्गनगरीतील मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओरोस एसटी बस स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
ई-पीक पाहणी अॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी दूर कराव्यात, मनरेगातील प्रलंबित प्रकरणांना त्वरित मंजुरी द्यावी, तसेच भात खरेदी केंद्रांवर तुटीच्या नावाखाली पावतीपेक्षा अधिक भात घेतला जात असल्याच्या प्रकारांना आळा घालावा, या प्रमुख मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत. भात खरेदी केंद्रे १ डिसेंबरपूर्वी सुरू करून प्रति गुंठा खरेदी मर्यादा वाढवावी, अशीही मागणी आहे. वितरित सोलार पंप नादुरुस्त असल्याने त्यांची दुरुस्ती करावी. सोलार पंप सक्तीचा न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंगल फेज व थ्री फेज वीज जोडणी द्यावी आणि सोलार पंपाची सबसिडी थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी. हवामान बदलामुळे काजू व आंबा पिकांना होणाऱ्या नुकसानीचा योग्य समावेश पिकविम्यात करावा, देशी गोवंश पालनासाठी गोसखी, गोसखा यांना प्रोत्साहन निधी द्यावा, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले असल्याची माहिती सूर्यकांत कुंभार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.