26964
पाणी योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने
सावंतवाडी पालिका सभेत आरोप; देखरेखीसाठी तज्ज्ञ नेमण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः शहरामध्ये ५७ कोटी रुपयांच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडे पाणीपुरवठा अधिकारी नाही. परिणामी तज्ज्ञ व्यक्तीअभावी हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. असे काम झाल्यास भविष्यात हे पाणी शहरातील नागरिकांपर्यंत सुरळीत पोहोचणार का?, ही शंका आहे. त्यामुळे तत्काळ या कामावर तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विरोधी शिंदे सेनेचे नगरसेवक संजू परब यांनी आज झालेल्या पहिल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयत्या वेळेच्या विषयात केली. याच योजनेच्या कामासाठी शहरात खोदलेल्या रस्त्याच्या परिस्थितीवर ॲड. नीता कविटकर यांनी प्रश्न उपस्थित करत रस्ते चांगले दाब देऊन एक लेवल करा. उडणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली.
सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तब्बल साडेचार वर्षांनंतर भाजप सत्ताधारी पक्षाचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीपासून ही सभा काहीशी वादळी स्वरुपात झाली; मात्र नगराध्यक्ष निरवडेकर यांनी ही सभा यशस्वीरित्या पार पाडली. सावंतवाडी शहराच्या मोती तलावाच्या काठावर बसवलेल्या कचराकुंड्यांमुळे मोती तलावाच्या पदपथावर अस्वच्छता पसरते. याकडे नगरसेविका सायली दुभाषी यांनी दिलेल्या अर्जावरून चर्चा झाली. कचराकुंड्यांना ‘लॉक सिस्टिम’ तसेच उंची वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून यावर मार्ग काढण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले. मोती तलावाच्या पदपथावर नगरपरिषदेच्या समोर असलेल्या अशोकाच्या झाडामुळे पदपथ खचतो. परिणामी ती झाडे काढावी, यावर चर्चा झाली; मात्र या झाडांमुळे त्या ठिकाणी अनेकांना सावली मिळते, हे विचारात घेता अशोकाची झाडे काढताना तेथे वेगळी सावळीची व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक श्री. परब यांनी केली. यावर विचार करून निर्णय घेऊ, असे प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी सांगितले.
येथील शिव उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. हा विचार योग्य असून यापूर्वीही मी नगराध्यक्ष असताना या संदर्भात निर्णय घेतला होता. या कामासाठी निधीची तरतूदही झाली होती आणि कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र, नंतर हे काम का होऊ शकले नाही, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी नगरसेवक परब यांनी केली.
शहरातील मंगळवारच्या आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी विशेषतः महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत निर्णय घेण्यात आला. शहरामध्ये बऱ्याच इमारती या जीर्ण आणि धोकादायक झाल्या असून संबंधित इमारतींच्या मालकांना तसेच घर मालकांना नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या संदर्भात सभागृहात विषय ठेवण्यात आला. या इमारत धारकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. कविटकर यांनी केली.
.................
नगराध्यक्षांच्या ऑनलाईन उपस्थितीला आक्षेप
नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले या सुटीवर असताना आज झालेल्या सर्वसाधारण सभेसाठी ऑनलाईन उपस्थित राहिल्या. त्याला विरोधी शिंदे सेनेचे नगरसेवक संजू परब यांनी सभेच्या सुरुवातीलाच विरोध केला. प्रभारी नगराध्यक्ष असताना आणि नगराध्यक्ष सुटीवर असताना ऑनलाईन उपस्थित राहण्याची गरज काय? हा प्रकार तत्काळ बंद करा, अशी मागणी केली. प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी ऑनलाईन सिस्टम बंद करण्याची सूचना केली.
................
‘त्या’ रंगमंचाला विरोध
शहरातील भोसले उद्यानशेजारी पार्किंग जागेच्या बाजूला असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंच उभारण्याबाबत सभागृहात चर्चा झाली. उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी हा विषय मांडला. त्याला नगरसेवक अजय गोंदावळे यांनी विरोध दर्शवला. संजू परब यांनीही या विषयाला हात घालत शहरात सुस्थितीत असलेल्या या उद्यानाला बाधा पोहोचू नये, यासाठी कायमस्वरुपी हा रंगमंच नको, असे सुचित केले. या विषयावर श्री. निरवडेकर यांनी चर्चेअंती निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.