पैसा बोलतो, आपण ऐकतो!... लोगो
(२० फेब्रुवारी टुडे ४) देवधरांचा फोटोही घेणे
महागाई आकड्यामधली.....अनुभवातली
आपण रोजच्या आयुष्यात महागाई अनुभवतो. भाजीचा दर वाढलेला असतो, दूध महाग झालेलं असतं, शाळेची फी वाढते, डॉक्टरांची फी वाढते त्यामुळे ‘महागाई वाढतेय’ हे सांगायला आकड्यांची गरज भासत नाही; पण तरीही जेव्हा महागाईचे सरकारी आकडे येतात तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो; जी महागाई आपल्याला जाणवते ती या सरकारी आकड्यांत का दिसत नाही? इथेच महागाई मोजण्याची पद्धत समजून घेणं गरजेचं ठरतं.
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
-----
महागाई म्हणजे सर्वसाधारणपणे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणं; पण अर्थशास्त्रासाठी इतकं सांगणं पुरेसं नसतं कारण, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो आणि त्याच खर्चाचं प्रमाणही वेगळं असतं. कुणाचा खर्च प्रामुख्याने अन्नावर असतो, कुणाचा शिक्षणावर, कुणाचा घरभाड्यावर तर कुणाचा प्रवास आणि आरोग्यावर. त्यामुळे महागाई ही संकल्पना अनुभवाच्या पातळीवर प्रत्येकासाठी वेगळी असते; परंतु देशपातळीवर धोरण ठरवण्यासाठी, तुलना करण्यासाठी आणि दिशा समजून घेण्यासाठी एक सर्वसाधारण चौकट आवश्यक असते. यासाठी वापरली जाणारी संकल्पना म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच कंझ्युमर प्राईस इंडेक्स् (CPI).यामध्ये सरकार एक ठराविक ‘वस्तू आणि सेवांची टोपली’ गृहित धरते. या टोपलीत अन्नधान्य, भाजीपाला, दूध, कपडे, घरभाडं, इंधन, शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या घटकांचा समावेश असतो. ही टोपली प्रत्यक्ष कुणी खरेदी करत नाही ती काल्पनिक असते; पण तिचा उद्देश विविध कारणांसाठी होणाऱ्या खर्चाचं प्रतिनिधित्व करणं हा असतो. या टोपलीतील वस्तूंच्या किमती काळानुसार किती बदलल्या यावरून महागाईचा दर ठरवला जातो. इथेच पहिला गोंधळ निर्माण होतो. कारण, ही टोपली ‘सरासरी’ माणसासाठी असते. तुमच्या घरात जर भाडं मोठा खर्च असेल तर भाडेवाढीचा परिणाम तुमच्यावर जास्त होतो; पण ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांना तो परिणाम जाणवत नाही त्याचप्रमाणे पेट्रोलचे दर वाढले तरी रोज वाहन वापरणाऱ्याची महागाई वेगळी आणि क्वचित प्रवास करणाऱ्याची वेगळी असते. म्हणूनच आकड्यांमधली महागाई आणि अनुभवातली महागाई यात फरक जाणवतो. आकडे चुकीचे नसतात ते फक्त सर्वांना सारखे लागू पडत नाहीत.
महागाई मोजताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो असा की, महागाई सर्वत्र आणि एकाचवेळी वाढत नाही. काही काळ अन्नधान्य महाग होतं तर काही वेळा शिक्षण किंवा आरोग्य खर्च झपाट्याने वाढतो. कधी इंधनदर वाढतात तर कधी सेवाक्षेत्र महाग होतं. त्यामुळे ‘महागाई कमी झाली’ असं ऐकलं तरी एखाद्या विशिष्ट खर्चात वाढ झालेली असू शकते. आकडा सरासरी दाखवतो; पण अनुभव नेहमी वैयक्तिक असतो.
महागाईचं मोजमाप समजून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण, त्याचा थेट संबंध आपल्या पैशाच्या खऱ्या मूल्याशी असतो. उत्पन्न वाढत असलं तरी महागाई त्याहून जास्त वेगाने वाढत असेल तर प्रत्यक्षात आपली क्रयशक्ती घटते म्हणूनच उत्पन्नाचे आकडे स्वतंत्रपणे पाहून चालत नाहीत; ते महागाईच्या पार्श्वभूमीवर पाहावे लागतात अन्यथा ‘उत्पन्न वाढले; पण हातात काहीच उरत नाही’ ही भावना कायम राहते.
गुंतवणुकीच्या बाबतीत तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरतो. एखादी योजना वर्षाला सहा टक्के परतावा देत असेल आणि महागाई सहा टक्क्यांच्या आसपास असेल तर आकड्यांनी पैसा वाढतो; पण मुल्याच्यादृष्टीने फारसा फरक पडत नाही म्हणजेच पैसा सुरक्षित आहे; पण तो वाढतोय असं म्हणता येत नाही. म्हणूनच दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना महागाई हा घटक दुर्लक्षित करता येत नाही. महागाई गुंतवणुकीची शत्रू नाही; पण तिचा विचार न केल्यास परताव्याचा अर्थच बदलतो. म्हणूनच महागाईकडे केवळ तक्रारीचा विषय म्हणून पाहण्याऐवजी ती कशी मोजली जाते, ती वेगळी का जाणवते आणि तिचा आपल्या उत्पन्न, बचत व गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो, हे समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आकड्यांमागचं तर्कशास्त्र समजलं की, महागाईची चर्चा भावनिक न राहता विवेकी होते आणि निर्णय अधिक वास्तववादी होतात.
पुढील लेखात आपण याच महागाईसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. महागाईच्या काळात फक्त बचत पुरेशी ठरते का की, गुंतवणूक अपरिहार्य बनते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.