मिऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक
अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक बैठक ; निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः शहराजवळील मिऱ्या येथील धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या अर्धवट कामामुळे आक्रमक झालेल्या मिऱ्या ग्रामस्थांनी जयस्तंभ येथील पत्तन अभियंता कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत प्रशासनाने थकीत निधी उपलब्ध झाला असून काम लवकरच पुन्हा सुरू होईल, असे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे रखडलेले काम आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतचा पेच सुटण्याची चिन्हे आहेत.
मिऱ्या समुद्रकिनारी टेट्रापॉड्स व ग्रोयन पद्धतीने बंधारा उभारला जात आहे. मात्र, या कामात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा ग्रामस्थांचे मत आहे. विशेषतः काँक्रीटच्या कामातील त्रुटींमुळे बंधाऱ्याच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत, सहायक अभियंता विणा पुजारी यांनी बैठकीत स्पष्ट केले की, ‘कामातील सर्व त्रुटी प्राधान्याने दूर करून कामाचा दर्जा राखला जाईल.’
पत्तन विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला मिऱ्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आपल्या वस्तीच्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते. मिऱ्या बंधाऱ्याचे काम प्रामुख्याने ठेकेदाराची देयके थकल्यामुळे ठप्प झाले होते. संबंधित ठेकेदाराचे सुमारे आठ कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याने कामाची गती मंदावली होती. यावर तोडगा काढण्यासाठी पत्तन विभागाने शासनाकडे २६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने सध्या १३ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. या निधीतून ठेकेदाराची थकीत रक्कम अदा केली जाणार असून, यामुळे ९०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे उर्वरित काम आता विनाविलंब सुरू होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी तात्पुरते समाधान व्यक्त केले असले, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------
चौकट
प्रत्यक्ष कामाला गती मिळणार
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास समुद्रकिनाऱ्यालगतच्या वस्त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही टांगती तलवार लक्षात घेऊन प्रशासनाने आता युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तांत्रिक अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.