27773
वेंगुर्लेचा नारायण तलाव सक्षम करू
नगराध्यक्ष गिरप ः पालिका सभेत अंदाजपत्रक, इतर प्रश्नही चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ : येथील पालिकेचे २०२६ - २७ चा ११२ कोटी १३ लाख २४ हजार ३६४ रुपये रकमेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात ९६ कोटी ४८ लाख ४२ हजार ४०० रकमेचा अंदाजित खर्च आणि १५ कोटी ६४ लाख ८१ हजार ९६४ रकमेच्या शिलकीचा समावेश असून, याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आजच्या विशेष सभेत अंदाजपत्रक मांडले. नारायण तलाव, भटकी कुत्री तसेच जनावरांचा बंदोबस्त, स्मशानभूमी, पाणीपुरवठ्याबात तूरतूद वाढवून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, रवींद्र शिरसाट, संदेश निकम, युवराज जाधव, सुधीर पालयेकर, दाजी परब, प्रशांत आपटे, सदानंद गिरप, सचिन शेट्ये, विनय नेरुरकर, नगरसेविका रिया केरकर, आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल, सुमन निकम उपस्थित होते.
भटकी कुत्री तसेच मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची शहरवासीयांची प्रमुख मागणी आहे. याबाबत एक एजन्सी नेमून दर महिन्याला त्यांचा बंदोबस्त करून याबाबत अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्याची मागणी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केली. दरम्यान, याबाबत तरतूद वाढवली असून, १४१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. पशुवैद्यकीय विभागाला पत्र देऊन जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे याबाबत केंद्र करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी किरुळकर यांनी सांगितले.
शहरात २ महत्त्वाच्या स्मशानभूमी असून, यात शहरातील नागरिकांना शुल्क द्यावे लागू नये, असा ठराव झाला होता; मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी खूप पैसे घेतले जातात. यामुळे तरतूद वाढवून स्मशानभूमी मोफत देण्याबाबत अंमलबजावणी करावी, असा ठराव नगरसेवक आपटे यांनी मांडला.
शहरात काही उंच भागात अजूनही पाणी जात नाही. नारायण तलावाचा प्रश्न मार्गी लागल्यास शहरातील सर्वच पाणीप्रश्न संपुष्टात येईल. त्यामुळे नवीन प्लोटिंग रिसॉर्टसाठी जो ५ कोटींचा निधी आला आहे, तो नारायण तलाव सुशोभीकरणासाठी वर्ग करावा. पर्यटनवृद्धीसाठी हे रिसॉर्ट गरजेचे असले, तरी पाण्याची मूलभूत गरज सर्वप्रथम मार्गी लावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, सुषमा प्रभूखानोलकर, काजल कुबल, रिया केरकर, दाजी परब यांनी केली. तर नारायण तलावाचे काम झालेच पाहिजे, यात दुमत नाही; मात्र प्लोटिंग रिसॉर्ट हे रद्द न करता, नारायण तलाव व रिसॉर्ट दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. पर्यटन दृष्टीने न. प चे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. नारायण तलावाचे अंदाजपत्रक करून ५ कोटींतील जेवढे पैसे लागतील ठेवढेच पैसे वर्ग करा, अशी मागणी नगरसेवक संदेश निकम व शितल आंगचेकर यांनी केली. यावर पालिकेचे ३ ते ४ प्रकल्प सीआरझेडमध्ये अडकले आहेत. यामुळे रिसॉर्टसाठी आलेले पैसे अगोदर नारायण तलाव कामासाठी वर्ग करावेत व प्लोटिंग रिसॉर्टच्या परवानगीसाठी प्रयत्न करावेत, असे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगून तसा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
---------
मुलांना मराठी शाळेत घालणाऱ्यांना सवलत
मराठी भाषा दिनी वेंगुर्ले नगरपालिकेच्या या सभेत मोठा निर्णय घेण्यात झाला. मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने आपली मुले मराठी शाळेत घालणाऱ्या पालकांना घरपट्टीत सूट देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवा, असा ठराव नगराध्यक्ष गिरप यांनी मांडला. तसेच महिला व बालकल्याण अंतर्गत शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता देणे, गुणवत्ता व संख्या वाढीसाठी विविध कार्यक्रम हाती घेण्याबाबत सभागृहात ठराव मंजूर केला.
.....
वेंगुर्ले शहराला गांजाचा विळखा
वेंगुर्लेत सातवीपासूनचे विद्यार्थी अमली पदार्थ, गांजाच्या आहारी गेले असून शहरातील मोकळ्या जागी पोलिसांनी रोज गस्त घालावी, असा गंभीर मुद्दा नगरसेवक प्रीतम सावंत यांनी मांडला. तर याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.