- rat१p६.jpg, rat१p७.jpg-
P२६O२७८८५, P२६O२७८८४
संगमेश्वर ः वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली असून विविध झाडांवर अशी रंगीबेरंगी फुले दिसत आहेत. (छाया : सुवर्णा भावे जोशी, चिपळूण)
----
वसंत ऋतूच्या स्वागतास मधुमालती बहरली!
रंगीबेरंगी फुलांनी शिशिर सजला ; निसर्गाच्या रंगांची उधळण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः निसर्गाचे फुलांचे विश्व मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. ऋतू कोणताही असो, निसर्ग विविध फुलांच्या माध्यमातून सृष्टीप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो. सध्या कोकणच्या निसर्गात पळस, काटेसावर (शाल्मली), बकुळ आणि नागचाफा यांसारखी फुले बहरली असतानाच, वसंताच्या आगमनापूर्वीच ‘मधुमालती’च्या वेलींनी जणू उत्सवाचा साज चढवला आहे.
मार्च महिन्याची चाहूल लागली की, मधुमालतीची वेल एखाद्या नववधूसारखी सजते. पानांपेक्षा फुलांचीच संख्या अधिक असलेल्या या वेली पाहिल्यावर अरसिक व्यक्तीची पावलेही क्षणभर थबकल्याशिवाय राहत नाहीत. मधुमालतीचा हा गंध आसमंत धुंद करून टाकतो आणि ही निसर्गदत्त धुंदी मानवी मनाला एक वेगळीच उभारी देते. मधुमालतीच्या फुलांचे अस्तित्व त्यांच्या रंगातून आणि गंधातून दुरूनही जाणवते. विशेष म्हणजे, ही फुले उमलताना खाली मान झुकवून (उलटी होऊन) फुलतात, जणू निसर्गाची मानवाप्रति असलेली नम्रता आणि कृतज्ञता त्यातून व्यक्त होत असते. पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या छटांमध्ये झुपक्यांनी फुलणारी ही नाजूक फुले संपूर्ण परिसर व्यापून टाकतात. त्यांच्या या एकत्र फुलण्याकडे पाहिले की, ‘एकत्र कुटुंब पद्धती’चे महत्त्व आणि त्यातील शक्तीची प्रकर्षाने जाणीव होते.
मधुमालतीची फुले तशी नाजूक असल्याने स्त्रिया त्यांचे वळेसर (वेणी) केसात माळत नाहीत; मात्र लहान मुली हौसेने या फुलांचे वळेसर बनवून आपल्या डोक्यावर माळताना दिसतात. उष्णता वाढू लागली की निसर्ग कात टाकतो, अशा वेळी नव्याने येणारी पालवी आणि फुलांचे हे ताटवे नव्या आनंदाचा साज चढवण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.