महिलांसाठी ११ ला
बांद्यात भजन स्पर्धा
बांदा ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा, बांदा शहर यांच्यावतीने खास महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ मार्चला दुपारी तीनला येथील आनंदी मंगल कार्यालयात होणार आहे. प्रत्येक भजनी मंडळात किमान ८ सदस्य असणे बंधनकारक राहील. प्रत्येक मंडळाला सादरीकरणासाठी ३० मिनिटांचा वेळ आहे. स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या ८ भजनी मंडळांनाच सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम दिनांक ६ मार्च आहे. नाव नोंदणीसाठी अवंती पंडित व माधवी गाड यांच्याशी संपर्क साधावा. परिसरातील महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
...................
संजय गांधी योजनेच्या
६४ प्रकरणांना मंजुरी
कणकवली ः तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २७) येथील तहसील कार्यालयात घेण्यात आली. या सभेत ६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसीलदार जी. एम. कोकरे आदी उपस्थित होते. सभेत संजय गांधी निराधार योजनेची ४२, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तिवेतन योजना १९, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना ३ अशी ६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
----
कलंबिस्त शिबिरात
२१ जणांचे रक्तदान
सावंतवाडी ः स्वराज्य रक्षक मंडळ, कलंबिस्त गणशेळवाडी व ऑन कॉल रक्तदाते, संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गणशेळवाडी शिवस्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, ऑन कॉल संस्थेचे जिल्हाध्यक्ष दयानंद गवस, सैनिक पतसंस्थेचे प्रल्हाद तावडे व इतर उपस्थित होते.
...................
माडखोल-सांगेली
रस्त्याचे काम सुरू
सावंतवाडी ः माडखोल ते सांगेली हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता खराब झाला होता. या रस्त्याचे आता नव्याने डांबरीकरण, खडीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व ओबीली सेल तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्याचे गेली सात वर्षे रखडलेले काम सुरू करण्यात आले असून याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
....................
सिंधुदुर्गनगरी येथे
आज लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी ः मार्च महिन्यातील लोकशाही दिन उद्या (ता. २) दुपारी १ ते २ या वेळेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मायनाक भंडारी सभागृहात आयोजित केला आहे. प्रलंबित वाद सोडविण्यासाठी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.