इंग्रजीकडे कल, मराठी शाळांना टाळे
ॲड. विलास पाटणे ः मातृभाषेतील शिक्षणाकडे होतेय दुर्लक्ष, २५५ शाळांना फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः मराठी ही केवळ एक भाषा नसून ती महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीची ओळख आहे. मात्र, अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे राज्यातील तब्बल २५५ मराठी शाळा बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात रत्नागिरीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील शाळांचाही समावेश आहे. याचा भाषिक संतुलनावर परिणाम होत असून, मराठी भाषा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, असे मत रत्नागिरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पालक शहरांकडे वळत आहेत. ‘आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच शिकावे, तरच त्यांना न्यूनगंड येणार नाही आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल,’ अशी मानसिकता पालकांमध्ये बळावली आहे. आज सुमारे ८६ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले आहे. जागतिक स्तरावर टिकण्यासाठी इंग्रजी आवश्यक असली, तरी मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती आणि वैचारिक बैठक पक्की होते, याकडे शिक्षणतज्ज्ञांनी वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या आठ वर्षांत खासगी शाळांच्या संख्येत ७३ टक्के वाढ झाली असून, हा आकडा ११ हजार ३४४ वरून १९ हजार ६३२ वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील स्पर्धेत मराठी शाळा मागे पडत आहेत. ‘मराठी शाळांमध्ये दर्जेदार मुले येत नाहीत, ही चिंतेची बाब आहे,’ असेही पाटणे यांनी नमूद केले. ते म्हणाले, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळणे स्वागतार्ह आहे. यामुळे देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय होईल. मात्र, केवळ दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनाचे प्रश्न सुटणार नाहीत. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणे, दर्जेदार साहित्य निर्मिती होणे आणि मराठी शाळांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे.
-----
उपाययोजना अन् भविष्यातील आव्हाने
* मराठी शाळांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अत्याधुनिक व्हावे.
* शिक्षकांना आधुनिक अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षित करणे आवश्यक.
* मराठीतून दर्जेदार शिक्षण देताना त्याला इंग्रजी भाषेची यथार्थ जोड द्यावी.
* मराठी ही केवळ व्यवहाराचीच नव्हे, तर ‘ज्ञानभाषा’ आणि ‘जगण्याची भाषा’ झाली तरच ती इंग्रजीशी स्पर्धा करू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.