28066
साहित्यिकांसह कलाकारांमुळे
‘मराठी’ समृद्ध ः हिंदळेकर
बर्वे ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन
देवगड, ता. ३ ः मराठी भाषा टिकवण्यासाठी तिचे संवर्धन करायला हवे. मराठीतील साहित्यिकांनी आणि कलाकारांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. तिची वैभवशाली परंपरा जपली पाहिजे. ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक राजेंद्र हिंदळेकर यांनी केले. येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात आयोजित मराठी गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथालयाने खरेदी केलेल्या व देणगीदाखल मिळालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला वाचकांकडून प्रतिसाद मिळाला. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. हिंदळेकर यांच्या हस्ते झाले. ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरुदेव परुळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष गणेश बांदकर, सचिव सीताराम पाटील, संचालक सदस्या मधुरा कुबल, अभिराम देसाई उपस्थित होते.
श्री. हिंदळेकर म्हणाले, ‘‘मराठी ही जगातील प्रमुख भाषांमध्ये एक संपन्न भाषा आहे. देशातील २२ अधिकृत भाषांमध्ये मराठीचे स्थान तिसरे आहे. व्यवहारामध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर करायला हवा. मराठी व्यवहाराची आणि विज्ञान भाषा व्हायला हवी, तरच ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, ’’ असे सांगून त्यांनी कुसुमाग्रजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. श्री. परुळेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सचिन दहिबावकर, संजीव राऊत, प्रकाश पंडित, अभिषेक बांदकर, धोंडू कोयंडे, ग्रंथपाल प्रशांत बांदकर आदी उपस्थित होते.