28239
सावंतवाडी, कोलगाव पाणीप्रश्नी तोडगा
समन्वय बैठक : ‘पाळणे कोंड’ योजना पूर्ण करण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : सावंतवाडी शहर आणि कोलगाववासीयांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न आता कायदेशीर कराराच्या माध्यमातून कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. पाळणे कोंड धरण प्रकल्पाद्वारे दोन्ही भागांची तहान भागवण्याबाबत येथील पालिका आणि कोलगाव शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या या योजनेला आता कायदेशीर कराराची जोड देऊन युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पाळणे कोंड धरण प्रकल्पाचे अपूर्ण काम आता तातडीने पूर्ण केले जाईल. या आराखड्यानुसार, कोलगावातून जाणाऱ्या पाईपलाईनद्वारे हे पाणी नरेंद्र डोंगरावरील साठवण टाकीत नेले जाईल. तिथून सावंतवाडी शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, त्याचवेळी कोलगावलाही त्यांच्या हक्काचे वाढीव पाणी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शहर आणि ग्रामीण भागातील पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
‘कोलगावच्या हक्काच्या पाण्याबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे. सर्व तांत्रिक बाबी तपासून आवश्यक कायदेशीर करार केला जाईल आणि हे काम तातडीने पूर्ण करून दोन्ही भागांतील जनतेला दिलासा दिला जाईल,’ असे आश्वासन ॲड. निरवडेकर यांनी यावेळी दिले. प्रारंभी नळपाणी योजनेचे काम रेंगाळल्याने श्री. डिसोजा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. या बैठकीला पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, मेघःश्याम काजरेकर, निशिकांत पडते, बाळू गवस, मारिया डिमेलो, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे उपस्थित होते.
..................
काय आहे प्रश्न?
पाळणेकोंड धरणावरील नगरपरिषदेची पाईपलाईन कोलगाव गावातून साधारण चार किलोमीटरपर्यंत जाते. सद्यस्थितीत पालिकेकडून कोलगावला प्रतिदिनी दोन लाख लीटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कोलगावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा पाणीपुरवठा पुरेसा नाही. कोलगावने पालिकेकडे दिवसाला दहा लाख लिटर पाण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मध्यंतरी तोडगा निघाला होता; मात्र त्यावर अधिकृत करार झाला नाही. सद्यस्थितीत पालिकेच्या नव्या नळपणी योजनेचे काम सुरू आहे. कोलगावातून या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम ग्रामस्थांकडून अडविले आहे. हे काम सुरू करण्यासाठी पालिकेला कोलगाव ग्रामस्थांच्या मागणीवर विचार करावा लागणार आहे. काल (ता. २) झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तरी यासंदर्भात पालिकेच्या मासिक सर्वसाधारण बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.
...................
कोट
कोलगावसाठी पूर्वी केलेल्या जुन्या करारानुसार पालिका पाणीपुरवठा करत आहे. मात्र, हा पाणीपुरवठा कमी आहे. मध्यंतरी नव्याने झालेल्या मागणीनुसार दिवसाला दहा लाख लीटर पाणी पुरवठा मिळावा, अशी मागणी आहे, तरच आम्ही गावातून नव्या पाईपलाईनचे काम करू देणार आहोत. काल झालेल्या प्रभारी नगराध्यक्षाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, यावर पालिकेमध्ये अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही.
- मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य
---
कोलगाव हद्दीतून येणाऱ्या नळपाळी योजनेच्या पाईपलाईनच्या कामाला तेथील ग्रामस्थांचा विरोध होता. कोलगावला पाणीपुरवठा देण्यासंदर्भात त्यांची मागणी होती. ग्रामस्थांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पालिकेच्या मासिक सर्वसाधण सभेत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- ॲड. अनिल निरवडेकर, प्रभारी नगराध्यक्ष, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.