28298
उत्पादन वाढीसाठी काजू प्रक्रियेला अत्याधुनिक करणार
काजू परिषद : काजू लागवड क्षेत्र वाढवण्यावरही चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ : आधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभे करून काजू मूल्यवर्धन साखळी विकसित करावी, असा निर्णय मुंबईतील राज्य काजू परिषद संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, ‘अपेडा’चे उपसरव्यवस्थापक वाघमारे तसेच शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक मनीष दळवी, डॉ. परशराम पाटील, धनंजय यादव आणि रुपेश बेलोसे उपस्थित होते.
राज्यात काजूची उत्पादनक्षमता चांगली असतानाही प्रक्रिया उद्योगासाठी काजू आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजूचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे. उत्पादक पट्ट्यात साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. छोट्या काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी योजना राबवताना व्हिएतनाम व कंबोडियातील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर आधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभे करावेत आणि काजू मूल्यवर्धन साखळी विकसित करावी. यासाठी काजू परिषद व संबंधित अधिकाऱ्यांनी गतीने काम करावे, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.
---
अनुदानाबाबत शासन विचार करेल!
काजू उत्पादनाचे आवश्यक उद्दिष्ट निश्चित करून तज्ज्ञ मनुष्यबळाच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचना या बैठकीत दिल्या. अपुऱ्या साठवणूक क्षमतेमुळे स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महिला बचतगट व सेवा संस्थांचा सहभाग वाढवून त्यांना ‘सोलर युनिट’ देण्याचे नियोजन करावे. ५००, १००० ते ५००० मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारल्यास सुमारे १ लाख ते १.२५ लाख टन साठवणूक क्षमता वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यासाठी आवश्यक अनुदानाबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असेही सांगण्यात आले.
---
सल्लागार नियुक्तीची चर्चा
व्हिएतनाममधील ‘फुल्ली ऑटोमॅटिक’ काजू प्रक्रिया प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्प अहवाल तयार करणे, आधुनिकीकरणाबाबतचा आराखडा तयार करणे तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी फिझिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पालघर येथे २०० मेट्रिक टन क्षमतेच्या काजू प्रक्रिया उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.