28253
सुवार्डा डोंगराच्या शिखरावर
गावाची पहिली मानाची होळी
मळगावच्या शिमगोत्सवाला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : कोकणच्या मातीत रुजलेल्या असंख्य परंपरा आणि लोकजीवनाचे रंग जपत, मळगावच्या (ता.सावंतवाडी) शिमगोत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मळगाव येथील उंच आणि निसर्गरम्य असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर गावाची पहिली आणि मानाची होळी उभारून या सात दिवसांच्या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
‘जसा गाव तशी रीत’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही परंपरा मळगाववासीयांनी आजही तितक्याच अभिमानाने जपली आहे. या परंपरेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथील सुवार्डा डोंगरावरील ही पहिली मानाची होळी तोडली जात नाही. गावातील इतर सर्व होळ्या शिमगोत्सव संपल्यानंतर एका महिन्याने, म्हणजे चैत्र पौर्णिमेला तोडल्या जातात; मात्र ही डोंगरावरील मानाची होळी पुढील वर्षाच्या होळी पौर्णिमेपर्यंत भगवे निशाण फडकवत दिमाखात उभी राहते. विशेष म्हणजे, मळगाव येथील मंदिराला इतर ठिकाणांप्रमाणे पारंपरिक दगड-धातूचा कळस नाही, तर सुवार्डा डोंगरावर फडकणारा हा भगवा ध्वजच मंदिराचा आणि गावाचा खरा ‘कळस’ मानला जातो. या भगव्या निशाणात गावकऱ्यांची श्रद्धा आणि ऐतिहासिक जाणीव एकवटली आहे.
उत्सवाच्या सुरुवातीला सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गावचे राऊळ, मानकरी आणि ग्रामस्थ वाजत-गाजत पायी चालत सुवार्डा डोंगराच्या शिखराकडे रवाना झाले. डोंगरावर पोहोचल्यानंतर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे शास्त्रोक्त पूजन करून ती उभारली. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात होळीसमोर सुंदर रांगोळी काढून सामूहिक गाऱ्हाणे व नवस घातले. भाविकांनी होळीला नारळ आणि प्रसादाचे तोरण अर्पण केले. सायंकाळी मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर मानाची मुख्य होळी उभारल्यानंतर गावातील प्रत्येक वाडीत होळ्या उभारल्या गेल्या. सात दिवस गावात भजन, कीर्तन आणि लोककलांच्या माध्यमातून हा पारंपरिक सण साजरा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.