कामगार कल्याण योजना वर्षभर खुल्या
अर्जदारांना दिलासा ; लाभार्थ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या नवीन धोरणानुसार कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आता वर्षभर खुल्या राहणार आहेत. यापूर्वी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित केलेली असायची, मात्र आता मंडळाने www.public.mlwb.in आणि शासनाच्या MAHADBT (आपले सरकार) पोर्टलवर या योजना कायमस्वरूपी खुल्या ठेवल्या आहेत. त्यामुळे वेळेवर गुणपत्रक, बोनाफाईड किंवा अन्य कागदपत्रे उपलब्ध न होणाऱ्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, लाभार्थी संख्येत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी ५ किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या आस्थापनेतील कामगार पात्र आहेत. ज्यांचा कामगार कल्याण निधी (रु. २५) जून आणि डिसेंबर या दोन टप्प्यांत भरला जातो, असे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील पाल्यांना या सवलती मिळतील. तसेच लिन (LIN) नंबर धारक कामगारही यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत चालू शिक्षणासाठी प्रतिवर्षी २ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो. यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीसाठी २ हजार रुपये, उच्च शिक्षणासाठी २५०० ते ३ हजार रुपये, तर पदविका आणि आयटीआयसाठी २५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यांसारख्या व्यावसायिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी ५ हजार रुपये दिले जातात. तसेच परदेशात पदव्युत्तर शिक्षण किंवा पीएच.डी. करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.