सीमा कदम, प्रवीण गुजर, अमेय लिमये यांना पुरस्कार
बोडस चॅरिटेबल ट्रस्ट; सदानंद झिंबरे, सुलोचना जाधव यांचाही सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने २०२५-२६ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. रत्नागिरीच्या डॉ. सीमा कदम, दाभोळचे प्रविण गुजर, साडवलीतील अमेय लिमये, देवाचे गोठणे येथील सदानंद झिंबरे आणि निरवडे (ता. सावंतवाडी) येथील सुलोचना जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रत्नागिरी येथील २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट येथे १८ वर्षे एन.सी.सी ए.एन.ओ. म्हणून काम करताना मेजर पदापर्यंत गेलेल्या आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यगौरव पुरस्कारात चौघांचा समावेश आहे. यात दाभोळ-गुजर आळी (दापोली) येथील किराणा मालाचे व्यापारी पण वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात स्वखर्चाने लाखभर रुपयांची विविध विषयांवरील शेकडो पुस्तके खरेदी करून खासगी संदर्भ ग्रंथालय निर्माण केलेले प्रविण पर्शुराम गुजर यांचा समावेश आहे. साडवली- देवरुख येथे ऑफसेट प्रिंटिंग आणि बुक बाईंडिंगचा व्यवसाय करताना, १५० पेक्षा जास्त देशांची नाणी व नोटा जमवण्याचा छंद जोपासताना, गेल्या २६ वर्षात देवरुख दशक्रोशीत वीज वहन यंत्रणेत बिघाड झाल्यावर आपला वेळ देऊन, पदरमोड करून लोकांची गैरसोय दूर करून जनमित्र बनलेले अमेय अशोक लिमये यांचाही सन्मान होणार आहे.
सोगमवाडी-देवाचे गोठणे (राजापूर) येथील दगडात कोरलेल्या अतिप्राचीन श्री नागदोबा देवस्थानाचे मानकरी म्हणून ३० वर्षे भाविकांची सेवा, तसेच घनदाट जंगल, बारमाही न आटणारी नागदोबा कोंड (जलस्त्रोत) व प्राचीन कातळशिल्पे यांचे संवर्धन करणारे सदानंद तानाजी झिंबरे, आणि निरवडे (ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) येथील गेली २६ वर्षे दररोज अप-डाऊन असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून काकडी, भाजी, हंगामी उत्पादने विकणाऱ्या स्वयंरोजगारीत सुलोचना अंकुश जाधव (गावकार) यांना सन्मानित केले जाईल.
---
६ मार्चला रत्नागिरीत गौरव
कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि तीन हजार असे आहे. प्रथमच महिला एन.सी.सी. अधिकाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे. रत्नागिरी बाहेरील चार सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी स्पीड पोस्ट आणि बँक हस्तांतरणाद्वारे दिली जाणार आहे. मेजर डॉ. सीमा कदम यांचा गौरव ६ मार्चला करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. आदिती पटवर्धन यांनी कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.