swt324.jpg
28336
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्योत्सवात कविता सादर करताना कवी नीलेश गावकर. सोबत सतीश लळीत, डॉ. सई लळीत, कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे.
साहित्यिक व्यासपीठे गावोगावी व्हावीत
नीलेश गावकर : ओरोसमध्ये रंगली काव्य मैफिल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ : रसिक आणि साहित्य यांना एकत्र आणण्याबरोबरच प्रस्थापितांप्रमाणेच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आणि मराठी साहित्याचा प्रसार करणारी ‘आम्ही साहित्यप्रेमी’ सारखी साहित्यिक व्यासपीठे गावोगावी निर्माण झाली पाहिजेत. ‘घुंगुरकाठी’ स्वयंसेवी संस्थेच्या या उपक्रमाचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा कवी नीलेश गावकर यांनी ओरोस येथे व्यक्त केली.
‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आणि १२ व्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे यांचा सहभाग असलेली ही मैफल टाळ्यांचा कडकडाट आणि ‘पुन्हा पुन्हा घ्या’ च्या उत्स्फूर्त दादने रंगली. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात ‘काव्योत्सव’ हे निमंत्रित कवींचे संमेलन आयोजित केले होते. सुमारे दोन तास चाललेल्या या कविसंमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवींनी आपल्या आशयपूर्ण कवितांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. ‘घुंगुरकाठी’ चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सई लळीत यांनी निमंत्रितांचा परिचय करून दिला.
श्री. गावकर म्हणाले, ‘‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या अक्षरयज्ञात समिधा अर्पण करण्याची संधी मला मिळाली. गेली चार वर्षे लिहिण्याचा जो प्रयत्न केला, तो मंचावर सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे दडपण होते; मात्र जाणकार रसिकांच्या प्रतिसादाने वातावरण हलकेफुलके झाले.’’ त्यांच्या ‘निळा रंग गेला आता या नभाचा’ आणि ‘तो एकटाच होता देहात प्राण असता’ या शेराला विशेष दाद मिळाली.
शिक्षकी पेशात असलेल्या श्रीमती मलये यांनी उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या सोशल मीडियाच्या काळात साहित्यिक व्यासपीठ सुरू करून सलग १२ कार्यक्रम करणे ही कौतुकास्पद बाब आहे. मराठी टिकवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे.’’ त्यांच्या ‘नदी वाहते’, ‘पुरुष’ आणि आईच्या आठवणींवरील ‘कंदिलाची काच’ या कवितांनी रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पत्रकार आणि अभिनेता असलेल्या श्रेयश शिंदे याने आपल्या शैलीदार सादरीकरणाने मैफल जिंकली. याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, संतोष कदम, पुरुषोत्तम लाडू कदम, ॲड. सुधीर गोठणकर, प्रमोद कोयंडे, स्वप्नील वेंगुर्लेकर, पी. एस. कौलापुरे, मेघना गावकर, विष्णुप्रसाद दळवी, आईना कदम, मधुकर जाधव, मनोहर सरमळकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.