28549
हत्तींना हटवा; अन्यथा ‘वन’समोर ठाण
कोलझर पंचक्रोशीतून इशारा; काजू उत्पन्नच सडले तर जगायचे कसे?
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : काजू उत्पन्नावर आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण चालते. आता काजू गोळा करण्याच्या हंगामातच बागामध्ये हत्तींनी ठाण मांडल्यामुळे उत्पन्न झाडाखाली सडून जात आहे, मग आम्ही पुढचे वर्षभर कुटुंब चालवायचे कसे?, असा संतप्त सवाल करत आमच्या पंचक्रोशीतून चार दिवसांत हत्तीना हटवा, अन्यथा आम्ही वन विभागासमोर ठाण मांडू, असा निर्वाणीचा इशारा कोलझर-तळकट दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी येथील वन विभागाला दिला.
सध्या हत्तींचा कळप कोलझर भागात तळ ठोकून आहे. त्याच्या दहशतीखाली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आहेत. आज येथील उपवनसंरक्षक कार्यालयात या संतप्त शेतकऱ्यांनी धडक दिली. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा मुंबईत गेल्याने या शिष्टमंडळाशी सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, ‘‘कोलझर, तळकट आणि शिरवल परिसरातील शेतकरी हत्तींच्या वाढत्या दहशतीमुळे पूर्णपणे हतबल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीला सावंतवाडी वनविभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. गेल्या वर्षी याच हंगामात हत्तींचा कळप आमच्या पंचक्रोशीत दाखल झाला होता. त्यावेळी हत्ती पकड मोहीम राबवायची आहे आणि हत्तींच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयाचे तज्ज्ञ आले आहेत, तोपर्यंत हत्तींना याच भागात राहू द्या, त्यांना येथून हटवू नका, अशी अजब भूमिका वन विभागाने घेतली होती; मात्र या प्रयोगामुळे हत्ती या भागात दीर्घकाळ स्थिरावले आणि त्यांनी नारळ, सुपारी व काजू बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. वन विभागाने ‘वनतारा’च्या नावाने रचलेला हा खेळ आम्हा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठरला.
आता पुन्हा यंदाच्या हंगामात हत्तींचा कळप या भागात दाखल झाला असून नुकसानीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. सध्या काजूचा मुख्य हंगाम सुरू आहे. आमच्या बहुतांश काजू बागा डोंगराळ भागात असून तिथेच हत्तींनी दिवस-रात्र मुक्काम ठोकला आहे. यामुळे काजू गोळा करायला जाता येत नाही. काजू वेळेवर गोळा न केल्यास ते सडून खराब होतात. या भागातील शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ काजू पिकावर अवलंबून आहे. पुढचा संपूर्ण महिना उत्पन्नाचा काळ आहे; अशा वेळी बागेत जाता आले नाही, तर आम्ही वर्षभर प्रपंच कसा चालवायचा? याचे उत्तर वन विभागाने द्यावे.’’
ग्रामस्थांनी पुढे सांगितले, ‘‘गेल्या वर्षी हत्तींनी अनेकांच्या बागा उद्ध्वस्त केल्या, ज्यामुळे लोकांच्या रोजीरोटीचे साधन कायमचे नष्ट झाले. आता हत्ती मानवी वस्तीजवळील बागांमध्ये येऊ लागले आहेत, ज्यामुळे भविष्यातील नुकसान अधिक गंभीर असेल. नाईलाजास्तव, पोटासाठी शेतकरी जीवावर उदार होऊन बागेत जातील. अशा वेळी जर कोणतीही जीवितहानी झाली किंवा शेतकरी हत्तींच्या पायी चिरडले गेले, तर त्याला पूर्णपणे सावंतवाडी वनविभाग जबाबदार राहील. ही भीषण परिस्थिती टाळण्यासाठी हत्तींना आमच्या भागातून तातडीने हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.’’ यावेळी कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच सुजल गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शामराव देसाई, ज्येष्ठ ग्रामस्थ आपा देसाई, महादेव देसाई, रोहन देसाई, दिलीप देसाई, अमर सावंत, विलास देसाई, उल्हास देसाई, सूर्यकांत गवस, अजित दळवी, तातोबा देसाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
.....................
ग्रामस्थांकडून तीव्र भावना व्यक्त
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्हा शेतकर्यांची या संकटातून मुक्तता करावी. येत्या चार दिवसांत अंमलबजावणी करावी. तसे न झाल्यास पंचक्रोशीतील शेतकरी उग्र आंदोलन उभारतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग असेल. आम्ही पंचक्रोशीतील शेतकरी सावंतवाडी वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठाण मांडून उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला.
......................
हत्तींना रोखण्यासाठी सौर कुंपण उभारावे
हत्तींना या भागातून हटवण्याच्या मुख्य मागणीसह गस्त प्रभावी करावी, असेही म्हणणे मांडण्यात आले. यात येथे तातडीने किमान दोन अतिरिक्त ड्रोन उपलब्ध करून द्यावेत, हत्तींना हटवण्यासाठी असलेले गस्ती पथक अधिक सक्षम आणि साधनसामग्रीनिशी सज्ज करावे, हत्ती वस्तीजवळील बागायतींकडे येत असल्याचे लक्षात येताच त्यांना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, हत्तींचा शिरकाव कायमचा रोखण्यासाठी ‘केर’ ते ‘कोलझर’ या मार्गावर ठिकठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे ‘हँगिंग’ कुंपण तातडीने उभारावे, हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एक वेगळी आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळेल, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
.....................
कोलझर भागातून हत्ती हटवण्याची ग्वाही
सहायक उपवनसंरक्षक बोराटे यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हत्तींना या भागातून हटवण्याबाबत आज सायंकाळपर्यंत कार्यवाही सुरू केली जाईल. तसेच पुढील १० दिवसांत काजू नुकसानीचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.