28557
सिंधुदुर्गचे ‘एआय’ मॉडेल राष्ट्रीय पटलावर
जिल्हा परिषदेचा दिल्लीत गौरव; ‘फ्रंटियर’मध्ये सादरीकरणाची संधी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः देशातील पहिला ‘एआय’युक्त जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नीती आयोगाच्या दिल्ली येथे झालेल्या ‘फ्रंटियर ५०’ कार्यशाळेत ‘एआय’ कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय कारभाराची मान अधिक उंचावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्हा परिषदेत ‘एआय’ प्रणाली लागू झाल्यापासून ‘एआय’ वापराचे फायदे आणि प्रशासकीय कारभाराच्या प्रगतीची माहिती दिली. राष्ट्रीय स्तरावर जिल्हा परिषदेच्या कारभाराची दखल घेतल्याने संपूर्ण देशभर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कारभाराचे कौतुक होत आहे.
१ मे २०२५ ला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ‘एआय’ कार्यप्रणाली प्रशासनात लागू केली होती. त्यानंतर प्रशासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरला होता. या अभिनव बदलाची दखल राज्य, राष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच घेण्यात आली होती. नीती आयोगातर्फे २७ फेब्रुवारीला विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ‘फ्रंटियर ५०’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. देशातील निवडक ५० जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. यामध्ये सिंधुदुर्गलाही स्थान मिळाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांची वक्ते व सादरकर्ते म्हणून निवड केली होती.
‘आकांक्षी’ जिल्हा कार्यक्रम व ‘आकांक्षी ब्लॉक्स’ कार्यक्रमांतर्गत ५० ब्लॉक्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध मंत्रालये, विभाग, तज्ज्ञ आणि क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्यांच्या सहभागातून तंत्रज्ञानाची ओळख, स्थानिकीकरण आणि प्रभावी अंमलबजावणी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
----
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक
मत्स्य विकास व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रेरणेने १ मे २०२५ ला सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या शासकीय कामकाजात ‘एआय’चा वापर सुरू केला होता. त्यामुळे ‘एआय’चा वापर आणि अल्पावधीतील प्रगती याची दखल घेत काही महिन्यांपूर्वी नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दौरा करून या प्रणालीच्या वापराची माहिती घेतली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले होते. परिणामी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ‘फ्रंटियर ५०’ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड केली होती.
-------
जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद
कार्यशाळेतील ‘फ्रंटियर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन्स फॉर ॲक्सेलरेटिंग एबीपी आउटकम्स’ या तांत्रिक सत्रात खेबुडकर यांनी ‘एआय’साठी उपयुक्त ठरलेल्या ‘महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हान्स्ड लॉ एनफोर्समेंट’ अर्थात ‘मार्वल’ या कंपनीच्या उपक्रमाचे सादरीकरण केले. या सत्रात कृत्रिम बुद्धिमता, मशीन लर्निंग आधारित उपाययोजना, कार्यप्रदर्शन निर्देशांक, अंमलबजावणीतील अनुभव आणि विस्तारयोग्यता यांवर विशेष भर दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब गौरवास्पद मानली जात आहे. श्री. खेबुडकर यांनी या केलेल्या सादरीकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभाराचा गौरव उपस्थितांनी टाळ्या वाजवून केला.
---
कोट
हा कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला आहे. जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या ‘एआय’ विषयक कामाचे नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर, तसेच देशातील ५० जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, आपल्या सादरीकरणापूर्वीच सिंधुदुर्गात ‘एआय’ क्षेत्रात होत असलेल्या कामाची प्रशंसा करण्यात आली, ही समाधानाची बाब होती. सर्वांच्या परिश्रमांमुळे आणि सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.