28632
वेंगुर्ले ः येथे बुधवारी आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी. शेजारी राजेंद्र गड्ड्यान्नावर, विलास सावंत, काका ढोके, एम. के. गावडे व इतर.
बागायतदारांना हवेत अडीच हजार कोटी
राजू शेट्टी : सरकार म्हणजे सावत्र आई, वेंगुर्लेतील मेळाव्यात टीकास्त्र
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ : ‘या देशात उद्योगपतींनी गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. या बँकांना रिझर्व्ह बँक भांडवल पुरवते आणि रिझर्व्ह बँकेत सामान्य करदात्यांचा पैसा जमा असतो; मग आज कोकणातील शेतकऱ्यांवर संकट आले आहे, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी का उभे राहत नाही? येथील शेतकऱ्याला सावरण्यासाठी केवळ अडीच हजार कोटींच्या तरतुदीची गरज आहे. एवढी तरतूद सरकार करत नसेल, तर या भागातून निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना याची लाज वाटली पाहिजे,’ अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे केली.
देवगड दौऱ्यात आंबा बागेत फिरताना हा गंभीर प्रश्न प्रकर्षाने जाणवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघ यांच्यातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र गड्ड्यान्नावर, विलास सावंत, काका ढोके, एम. के. गावडे, संजय गावडे, विजय नाईक, विजय प्रभू आदी होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘आपली गाठ संवेदनशून्य सरकारशी आहे; मग आपण संघर्ष कधी करणार? हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांची सावत्र आई आहे. तिला पान्हा फुटण्यासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागेल. लोकशाहीत आकड्यांच्या बळाला महत्त्व असते. आम्हाला शक्तिप्रदर्शन करायचे नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.’’ कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच आपला हक्क मागायला लागला आहे. आता नुकसानभरपाई घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. मी शेतकऱ्यांसाठी ३०२ कलम अंगावर घेणारा माणूस आहे. मी खटल्यांना घाबरत नाही. स्वाभिमानाच्या चळवळीत अशक्य हा शब्द नाही. १२ मार्चला वाघाप्रमाणे पंजा मारून आपला हक्क खेचून आणूया!’’
चौकट
कीटकनाशक कंपन्यांचा हिशोब आता चुकता
काही कंपन्या बंदी असलेली कीटकनाशके विकत असून, त्याचा परिणाम मधमाश्यांवर होत आहे. यामुळे परागीकरण थांबले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर संशोधन करण्यात कृषी विद्यापीठे अपयशी ठरल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. पीक आले तेव्हा आम्ही पैसे दिले, आता पीकच आले नाही तर हिशोब चुकता झाला, असे सांगत त्यांनी कीटकनाशक कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा खर्च कमी करून घेणार असल्याचे जाहीर केले.
चौकट
न्याय मिळेपर्यंत रस्ता सोडणार नाही
येत्या सहा मार्चच्या अर्थसंकल्पात आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास, १२ मार्चला ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात होईल. न्याय मिळत नाही, तोपर्यंत रस्ता सोडायचा नाही, असे आवाहन संजय गावडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.