(हापूसचे चित्र वापरणे)
आखातातील ‘हापूस’ निर्यातीला युद्धाच्या झळा
वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता ; स्थानिक बाजाराकडे वळणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः इराण, इराक आणि आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाचा परिणाम कोकण हापूसच्या निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ३० टक्के माल आखाती देशांमध्ये जातो; मात्र, युद्धाच्या सावटाखाली हवाई आणि समुद्रमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाल्यास स्थानिक बाजारातील हापूसविक्रीसाठी आंबा मुबलक राहील, अशी शक्यता आहे.
वाशी मार्केटमधून हापूसची एकूण ४० टक्के निर्यात होते. त्यातील सिंहाचा वाटा (३० टक्के) हा दुबई, बहरिन, कतार, दोहा, कुवेत, सौदी आणि जॉर्डन या देशांचा आहे. उर्वरित १० टक्के माल इतर देशांमध्ये पाठवला जातो. याच आखाती देशांमध्ये सध्या युद्धाच्या झळा लागल्याने निर्यातीसाठी आवश्यक मार्ग असुरक्षित झाला आहे.
प्रामुख्याने मध्यम आकाराचा आंबा निर्यातीसाठी पसंतीचा असतो; मात्र हा माल परदेशात न जाता स्थानिक बाजारपेठेतच अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. निर्यात होणारा हापूस स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीस येणार आहे. मात्र, निर्यात थांबल्यास हापूसचे दर टिकवून ठेवणे व्यापाऱ्यांसाठी कठीण जाणार आहे.
दरम्यान, यंदा हापूसचे उत्पादन कमी आहे. फेब्रुवारी महिन्यात कोकणातून वाशीत दाखल होणाऱ्या पेट्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. सध्या दिवसाला सरासरी ६० ते ७० पेट्या वाशीत येत असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १० टक्के मालाचा समावेश आहे. सद्यःस्थितीत वाशी बाजारपेठेत ५ ते ७ डझनच्या हापूस पेटीला ६ ते १२ हजार रुपयांपर्यंत चांगला दर मिळत आहे.
------
कोट
२५ मार्चनंतर हापूसची मोठी आवक एकाचवेळी बाजारात येण्याची शक्यता आहे. नेमक्या याच काळात युद्ध सुरू राहिले तर निर्यातीला फटका बसेल. युद्धाच्या कालावधीवर हापूस निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे.
- संजय पानसरे, वाशी मार्केट
----
कोट २
यंदा उत्पादन अत्यंत कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातच माल कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच निर्यातीलाही माल कमी असेल. युद्धजन्य परीस्थिती राहिल्यास आखाती देशांसह उर्वरित देशांमध्ये हापूस निर्यात होऊ शकेल. दरावर परिणाम होईल असे वाटत नाही.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार
-----
दृष्टिक्षेपात
* आखाती बाजारपेठ धोक्यात
* सध्या दिवसाला ६०-७० पेट्यांची संथ आवक
* निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात आल्यास दर गडगडण्याची शक्यता
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.