अंतराळाच्या अंतरंगी ..............लोगो
(२२ फेब्रुवारी पान ६)
ख.. खगोलाचा गिरवणे
हा अस्तित्वाचा शोध
मानवी संस्कृतीचा उष:काल झाला आणि मानवाने पहिली अभ्यासपूर्ण नजर वर अथांग आकाशाकडे वळवली, तेव्हापासून खगोलशास्त्राचा एक अद्भुत प्रवास सुरू झाला. रात्रीच्या काळ्याशार अवकाश मखमलीवर विखुरलेले लक्षावधी तारे, शीतल चांदणे आणि दररोज न चुकता उगवणारा सूर्य, हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून ते एक अथांग आणि गणिती शास्त्र आहे. ‘ख’ म्हणजे आकाश आणि या अथांग पोकळीतील ग्रह-ताऱ्यांचा वेध घेणे म्हणजे ‘खगोलशास्त्र’. हे शास्त्र केवळ दुर्बिणीतून पाहण्यापुरते मर्यादित नसून, ती एक वैश्विक जगण्याची दृष्टी आहे.
- प्रा. बाबासाहेब सुतार,
रत्नागिरी
---
खगोलशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? याचे उत्तर आपल्या अस्तित्वातच दडलेले आहे. आपले ऋतूचक्र, समुद्राची भरती-ओहोटी, पावसाचे आगमन आणि अगदी आपल्या हातातील घड्याळ हे सर्व या खगोलीय हालचालींचेच अपत्य आहे. ज्याला आकाशाची भाषा समजते, त्याला निसर्गाचे गुपित उमजते. प्राचीन काळापासून मानवाने या ताऱ्यांच्या भाषेतूनच दिशादर्शन आणि काळाचे अचूक गणित मांडले आहे. जगाच्या पाठीवर खगोलशास्त्राच्या अभ्यासाची अद्भुत उदाहरणे विखुरलेली आहेत. इंग्लंडमधील ‘स्टोनहेंज’ (Stonehenge) हे त्याचे एक जिवंत प्रतीक. हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय उभारलेले हे अजस्त्र दगड ‘अयन’ आणि ‘संपात’ बिंदूंचा अचूक वेध घेतात. वर्षातील सर्वात मोठ्या आणि लहान दिवशी सूर्याचा प्रकाश या दगडांमधून विशिष्ट कोनात पडतो, जे त्या काळातील मानवाचे प्रगत खगोलशास्त्रीय कौशल्य दर्शवते.
भारताच्या बाबतीत, महाराजा सवाई जयसिंग यांनी १८ व्या शतकात उभारलेली ‘जंतर-मंतर’ ही वेधशाळा आजही जगाला थक्क करणारी आहे. दिल्ली, जयपूर, मथुरा, वाराणसी आणि उज्जैन येथील ही विशाल पाषाण उपकरणे आजही सेकंदाच्या अचूकतेने ग्रहांची स्थिती आणि स्थानिक वेळ सांगतात. हे केवळ दगड नसून ते काळाचे मोजमाप करणारी भव्य मानवी यंत्रे आहेत. जयपूर येथील ‘सम्राट यंत्र’ हे तर दोन सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारे भव्य सूर्यघड्याळ आहे.भारतीय कालगणनेचा पाया हा चंद्राच्या कलेवर आणि सूर्याच्या व नक्षत्रांच्या भ्रमणावर आधारित आहे. चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची नावे ही चित्रा, विशाखा, ज्येष्ठा यांसारख्या नक्षत्रांवरून पडली आहेत, जे आपल्या पूर्वजांच्या सूक्ष्म निरीक्षणाचे फळ आहे. शुद्ध आणि वद्य पक्षातील तिथींच्या खेळातून आपली संस्कृती आणि सण-उत्सव घडले आहेत. पृथ्वी आपल्या अक्षावर २३.५ अंशाच्या कोनात झुकल्यामुळे निसर्गात ‘उत्तरायण’ आणि ‘दक्षिणायन’ ही मोठी स्थित्यंतरे घडतात हे आता शाळकरी मुलेही जाणतात. २२ डिसेंबरपासून सूर्याचा आकाशमार्गे उत्तरेकडील प्रवास सुरू होतो, ज्यामुळे दिवसाची लांबी वाढू लागते, तर २१ जूनपासून सूर्य दक्षिणायनाकडे मार्गाक्रमण करतो.या वार्षिक प्रवासात दोन क्षण असे येतात, जेव्हा वेळेचा पूर्णतः समतोल साधतो. २१ मार्च (वसंत संपात) आणि २३ सप्टेंबर (शरद संपात) रोजी दिवस आणि रात्र समसमान असतात. या स्थितीला ‘विषुव’ (Equinox) म्हणतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यांत खगोलशास्त्राचेच संगीत गुंफलेले आहे; फक्त ते जाणून घेण्यासाठी खगोल अभ्यासाचे डोळे व कान सजग हवेत. वर्षभरातील ठळक घटनांमध्ये कालक्रमाने येणारी सूर्यग्रहणे, चंद्रग्रहणे आणि नयनरम्य उल्कावर्षाव या घटना म्हणजे आकाशातील महानाट्य असतात. हे केवळ पाहण्यासाठी नसून, त्यातील खगोलीय भूमिती-गणित समजून घेण्यासाठी असतात. अनेकांना प्रश्न पडतो की, आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात या शास्त्राचा काय संबंध? तर याचे उत्तर आपल्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमध्ये दडलेले आहे. आपण जे जीपीएस (GPS) वापरतो, ते अवकाशातील उपग्रहांच्या आणि खगोलीय संदर्भांच्या अचूकतेशिवाय अशक्य आहे. हवामानाचा अंदाज असो, इंटरनेटची क्रांती असो, या सर्वांच्या मुळाशी खगोलशास्त्राचे नियम आहेत. इतकेच काय, आधुनिक वैद्यकशास्त्रात वापरले जाणारे ‘एमआरआय’ (MRI) तंत्रज्ञान किंवा कॅमेऱ्यातील ‘सीसीडी’ (CCD) सेन्सर हे मुळात खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचीच देणगी आहेत.
* खगोलशास्त्राची ‘बाराखडी’ कशी गिरवावी?
ज्याप्रमाणे आपण लहानपणी मुळाक्षरे गिरवून लिहायला शिकतो, तशीच खगोलशास्त्राची ‘बाराखडी’ गिरवण्यासाठी आपल्याला काही प्राथमिक तयारी करावी लागते. हे शास्त्र शिकणे म्हणजे आकाशाचे पुस्तकवाचन होय.
* दिशादर्शन (दिशेची ओळख) : ज्याप्रमाणे अक्षरांच्या वळणाची ओळख करून घेतो, तशीच पहिली ओळख म्हणजे दिशांची. रात्रीच्या वेळी उत्तर दिशेला स्थिर असलेला ‘ध्रुव तारा’ शोधणे, हे खगोलशास्त्रातील पहिले अक्षर गिरवण्यासारखे आहे. एकदा उत्तर दिशा समजली की, आकाशाचा नकाशा उकलणे सोपे जाते.
* तारकासमूहांचे निरीक्षण : वहीवर अक्षरे गिरवल्याप्रमाणे आकाशात ‘शर्मिष्ठा’ (Cassiopeia), ‘सप्तर्षी’ (The Big Dipper) किंवा ‘मृग नक्षत्र’ (Orion) शोधण्याचा सराव करावा. हे तारकासमूह म्हणजे खगोलशास्त्रातील तारकांच्या मुळाक्षरांनी बनलेले शब्द आहेत. यांच्या मदतीने ध्रुव तारा ओळखता येतोच, पण त्यांच्या आकृत्या लक्षात ठेवल्या की अवकाशाचे वाचन सुलभ होते. त्यांच्या आधाराने इतर तारकाकृती लक्षात राहतात.
* चंद्राची रोजनिशी : आपण जसा सुलेखनाचा सराव करतो, तसा चंद्राच्या रोजच्या कलांच्या निरीक्षणाचा सराव करावा. दररोज चंद्र कोणत्या वेळी उगवतो, त्याचा आकार कसा बदलतो आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे, याची नोंदवही ठेवणे ही खगोलशास्त्राची ‘पहिली इयत्ता’ आहे.
* साधनांची निवड : सुरुवातीला महागड्या दुर्बिणीऐवजी साध्या डोळ्यांनी आणि नंतर द्विनेत्रीच्या (Binoculars) मदतीने आकाश न्याहाळावे. मोबाईल फोनवर उपलब्ध असलेल्या अनेक मोफत ॲप्सचा वापर करून तंत्रज्ञानाच्या पाटीवर आकाशातील ग्रह-तारे ओळखावेत.
* स्थानिक खगोल मंडळांशी संवाद : शाळेत गुरुजींचे बोट धरून शिकतो तसे स्थानिक अभ्यासक किंवा खगोल मंडळांच्या उपक्रमांत सहभागी झाल्यास या अभ्यासाला लवकर गती मिळू शकते.
खगोलशास्त्र अभ्यास म्हणजे केवळ ताऱ्यांची गणना, आकाशओळख किंवा अचंबित होणे नसून, ती नम्रतेची शिकवण आहे. जेव्हा आपण अंतराळाच्या अथांगतेचा विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण या विशाल ब्रह्मांडातील एका छोट्याशा ‘निळ्या ठिपक्यावर’ राहणारे प्रवासी आहोत. ही जाणीवच आपल्याला अधिक संवेदनशील आणि जिज्ञासू बनवते. त्यामुळेच ‘ख’- खगोलाचा गिरवताना आपण प्रत्यक्षात स्वतःच्या अस्तित्वाचाच शोध घेत असतो.