29260
‘संगीतगोष्ट’ माझ्यासाठी लाखमोलाची
प्रणय शेट्ये : शिडवणे शाळेत ‘आनंददायी शनिवार’
तळेरे, ता. ७ : ‘‘ज्या गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात, त्या आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतात. म्हणूनच मला आवडणाऱ्या संगीताला मी माझा व्यवसाय बनवले आहे. ही ‘संगीतगोष्ट’ माझ्यासाठी लाखमोलाची असून, ती मला आत्मिक आनंद देणारी आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार प्रणय शेट्ये यांनी केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ मध्ये आज ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिडवणे-गावठणवाडी येथील सुपुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार प्रणय यांनी यावेळी शाळेतील मुलांशी ‘हृदय संवाद’ साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी शेट्ये यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ (बुके) शेट्ये यांना भेट दिला. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कलाकृतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी ‘द्रौपदी क्रिएशन’अंतर्गत प्रणय शेट्ये यांनी संगीतबद्ध केलेले ‘कोकण कोकण’ हे लोकप्रिय गीत विद्यार्थ्यांना ऐकवले. त्यानंतर मुलांशी हितगुज साधताना शेट्ये म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आपला नियमित अभ्यास जर आवडीने केला, तर त्यात नक्कीच प्राविण्य मिळवता येईल.’’ केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर सुसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, आपण ज्याप्रमाणे रोज देवाला नमस्कार करतो, त्याचप्रमाणे आपल्या आई-वडिलांनाही रोज वंदन केले पाहिजे आणि थोरामोठ्यांचा आदर राखला पाहिजे. उपमुख्याध्यापिका वेदिका चव्हाण म्हणाल्या, ‘‘प्रणय यांच्या उपस्थितीमुळे आजचा शनिवार खऱ्या अर्थाने ‘आनंददायी’ झाला आहे.’’ कार्यक्रमाच्या शेवटी शेट्ये यांनी ज्ञानेश्वरीतील एक भावपूर्ण प्रार्थना सादर केली, जिने उपस्थित सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.