ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा...
भारत मुक्ती मोर्चा; विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात सुरू असलेल्या प्रक्रियेत ओबीसी नोंदणीसाठी स्वतंत्र रकाना ठेवलेला नाही. ही ओबीसी समाजाची स्पष्ट फसवणूक आहे, असा आक्षेप ओबीसी संघटनांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शासनाने या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, येत्या १३ मार्च रोजी देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतही या आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, अशी मागणी निवेदनात प्रामुख्याने करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करताना विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे निवेदन देताना कुणबी क्रांती संघटनेचे सलील डाफले, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष अनिल पोटफोडे, भारत मुक्ती मोर्चाचे संजय कदम, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय आयरे, तालुकाध्यक्ष भगवत जाधव, किसान मोर्चाचे विजय कुरतडकर, भीम आर्मीचे प्रदीप पवार, विद्यार्थी मोर्चाचे सौरभ आयरे, प्रोटानचे अध्यक्ष शैलेंद्र औघडे आणि प्रकाश पवार (पावस विभाग) यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
------
चौकट
शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
२०११ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ''टीईटी'' (TET) परीक्षेची सक्ती रद्द करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करतानाच संघटनांनी केवळ जनगणनेचाच नव्हे तर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.