सत्संग---------लोगो
(सदरप्रमाणे घेणे)
श्रीज्ञानेश्वरीचे अद्वितीय भाष्यकार
पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांची ३६ वी पुण्यतिथी १२ मार्च रोजी आहे. त्यानिमित्त श्री ज्ञानेश्वरीच्या या अद्वितीय अभ्यासकाच्या, श्री माऊलींचे नेमके हृद्गत जाणणाऱ्या अपूर्व उपासकाविषयी... !
- रोहन विजय उपळेकर
----
मराठी सारस्वताची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून निःसंशय भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रीज्ञानेश्वरीचेच नाव घ्यावे लागेल. श्रीज्ञानेश्वरी हा या सहस्रकातील तत्त्वज्ञान क्षेत्रातला अत्यंत मोठा चमत्कार आहे. श्री माऊलींची साहित्यसंपदा त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, निष्कामांसाठी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अलौकिक वाक्चातुर्याने लोक सुखी होतात, हे जरी सत्य असले तरी, या साहित्यसागरात सखोल बुडी मात्र आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले आणि विचक्षण बुद्धिवैभवाने मंडित झालेले विरळे जनच देऊ शकतात, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच हे दैवी वाङ्मय मोहक आणि मधुर असले, तरी तुम्हां-आम्हां सर्वसामान्यांच्या आकलनासाठी मात्र काहीसे दुर्बोध ठरते. यास्तव कोणा ‘जाणत्या’च्या माध्यमातूनच आपल्याला त्यात प्रवेश करावा लागतो. आजवर होऊन गेलेल्या अशा श्रीज्ञानेशकृपांकित ‘जाणत्यां’मध्ये निःसंशय सद्गुरू योगिराज मामासाहेब देशपांडे महाराजांचे नाव अग्रक्रमावर आहे.
पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज हे अधिकारसंपन्न होते. त्यांची उपलब्ध ग्रंथसंपदा निगुतीने पाहिल्यास आपल्याला त्यांचा निकोप दृष्टिकोन आणि त्यांच्या सांगण्यातला स्वानुभूतीचा सच्चेपणा, जाणत्याचा परखडपणा व प्रेमाचा ओलावा जाणवल्याशिवाय राहत नाही. नवल असे की, एवढी अनुभवाची खोली असूनही सद्गुरू मामासाहेब स्वतःला मात्र ‘श्रीज्ञानेश्वरीचा तुच्छ दास’च मानीत असत.
हे वाङ्मय ‘मनाचेनि निजांगे’ भोगावे लागते. ही सिद्धी माउलीकृपेने पूजनीय मामांना पुरेपूर आकलन झालेली होती. त्यामुळेच त्यांनी जेवढ्या खोलवर जाऊन श्री माऊलींच्या शब्दांचे स्वर्गीय सौंदर्य सर्वसामान्यांना दाखवले होते, ते थक्क करणारे आहे.
श्री माउली स्वमुखाने सांगतात की, ‘संप्रदाय पांघरूनच अभ्यास करून अनुभव घ्यायचा असतो!’ संप्रदाय पांघरून म्हणजे नेमके कसे? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आहे, पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांसारखे व्यक्तिमत्व! ते सांगत की, ‘माउलींची ओवी’ ही माउलींच्याच ग्रंथांच्या आधाराने सोडवावी. कारण माउली जे काही बोलतात त्याचे स्पष्टीकरणही त्यांनीच कुठे ना कुठे संकेताने किंवा स्पष्टपणे देऊन ठेवलेले असते. ते आपल्याला बरोबर शोधता आले की, चमत्कार झाल्यासारखे या दैवी सारस्वताचे निगूढ रत्नदालन उघडते. ‘सद्गुरू श्री माऊलींची शब्दयोजना अनेक अर्थ प्रकट करणारी आणि अचूक असते. त्यातला सूक्ष्म बारकावा आपल्या ध्यानात आला, तरच त्या शब्दयोजनेचे खरे सौंदर्य आणि प्रभाव आस्वादता येतो. पण यासाठी फार तयारीचा अभ्यास लागतो. मामासाहेब देशपांडे महाराज हे असेच श्रेष्ठ अभ्यासक होते!
मामांचे सांगणे श्री माऊलींच्या कृपेने कसे अचूक आणि चपखल होते पाहा. ‘एकांत’ हा आपल्या अगदी ओळखीचा शब्द आहे. पण त्याचा अर्थ आपल्याला खरंच माहीत आहे का? तर नाही. मामा या शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगतात की, ‘एक’ म्हणजे ‘मन’. त्या मनाचे अनेक विकल्प असतात. त्या सगळ्या विकल्पांचा आणि मनाचा अंत म्हणजे एकांत. तो कुठे असतो? तर परमेश्वरापाशी, अन्य कुठेच नाही!’
श्री. मामा अतिशय सोप्या, घरगुती उदाहरणांनी कठीण विषय समजावून सांगत असत. ही हातोटी त्यांच्या मातुःश्रींकडूनच त्यांना मिळालेली होती. सद्गुरू श्री माउली ‘हरिपाठा’त म्हणतात, ‘भावेवीण देव नकळे निसंदेह’. याचे स्पष्टीकरण श्री. मामा असे करतात की, ‘भाव निर्माण होण्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हावे लागते.’
इंद्रियांचे विषय आत असतात की बाहेर? यावर मामा पुराणातले एक उदाहरण देऊन सुरेख समजावतात की, ‘विषय बाहेर आहेत ही कल्पना निखालस चुकीची आहे. कशी? तर, विश्वामित्रांना भुलवण्यासाठी इंद्राने मेनका अप्सरेला पाठवले. तसेच श्री शुकदेवांना भुलवण्यासाठी रंभेची योजना केली. विश्वामित्रांच्या आत विषय जागृत होता म्हणून ते भुलले आणि अपत्य होईपर्यंत त्यांनी मेनकेबरोबर संसार केला. परंतु शुकदेवांचे तसे नव्हते; त्यांच्या आत विषय नसल्याने रंभेकडे, तिच्या कामुक हावभावांकडे पाहूनही ते तिच्याशी लिप्त झाले नाहीत. या दृष्टांतावरून स्पष्ट होते की, विषय आत आहेत, बाहेर नाहीत.’
सद्गुरू श्री माउली हे अत्यंत अद्भुत भाष्यकार आहेत. त्यांचे निसर्गाचे, भोवतालाचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाचे त्यांनी आपल्या वाङ्मयातून केलेले अप्रतिम उपयोजन हा खरोखर असंख्य प्रबंधांचाच विषय ठरावा. सद्गुरू श्री माऊलींच्या आणि त्यांच्या वाङ्मयाच्या सततच्या अनुसंधानामुळे श्री. मामांचे निरीक्षण देखील अगदी तसेच अद्भुत झालेले होते. याचे एक विलक्षण उदाहरण म्हणजे- आपल्या ‘मुद्रेची प्रौढी ऐसी’ या पुस्तकातील ‘मग कंठनाळ आटे । (ज्ञाने. ६.१३.२०७)’ या ओवीवरील प्रवचनात ते आटण्याची प्रक्रिया समजावून सांगतात. त्यासाठी त्यांनी चितेवर जळणाऱ्या प्रेताचे उदाहरण दिले आहे. प्रेताला जसजशी आगीची धग लागायला लागते, तसतसे त्याचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके आक्रसते, आत ओढले जाऊ लागते. त्याला ‘शव आटणे’ म्हणतात. साधनेने कंठनाळ आटते, तेव्हा साधकाच्या शरीरात अशीच प्रक्रिया घडत असते. यावरून आपल्याला जाणवते की, श्री. मामा अक्षरशः प्रत्येक क्षणी ज्ञानेश्वरीचेच चिंतन करत असले पाहिजेत. समोर प्रेताचे अग्निसंस्कार चालू असतानाही त्यांच्या अंतरात मात्र श्री माउलींच्याच ओव्या अखंड रुंजी घालत होत्या.
पूजनीय मामासाहेबांनी ज्ञानेश्वरी जगभरातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करून ती संपूर्ण जगात घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला. आपल्या हयातीतच मराठीसोबत कानडी भाषेतही श्री ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. या दृष्टीने आता त्यांनी स्थापन केलेले ‘श्रीवामनराज प्रकाशन’ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून बहुतांश अभ्यासकांनी मान्यता दिलेली श्री ज्ञानेश्वरीची ‘कुंटे प्रत’ नुकतीच तीन सर्वांगसुंदर प्रकारांमध्ये पुनःप्रकाशित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.