rat9p16.jpg
29768
चिपळूण ः पागनाका येथे उड्डाणपुलासाठी मातीचा भराव सुरू असताना डंपरची दुचाकीला धडक बसल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
--------------
चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामाने ताप
ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियोजनाचा अभाव, धुळीसह विखुरलेल्या साहित्याने गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाग-बौद्धवाडी परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ, राडारोडा आणि बांधकाम साहित्य विखुरलेले असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कामे सुरू असली तरी नियोजनाच्या अभावामुळे त्रास वाढल्याची भावना प्रवाशांत व्यक्त होत आहे. नियोजनशुन्य कामाचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मातीचा भराव करणारे डंपर भरधाव वेगाने येत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
प्रांताधिकारी कार्यालयापासून पुढे पाग-बौद्धवाडीपर्यंत उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम करताना त्याचे योग्य ते नियोजन झाले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. पाग-बौद्धवाडी येथून विरेश्वर कॉलनीकडे जाण्यासाठी अंडरपास करावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला होता. तरीही उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
पाग-बौद्धवाडीतील ग्रामस्थांना वीरेश्वर कॉलनी मार्गे बसस्थानक किंवा बाजारात जायचे असल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोरील अंडरपास किंवा पंचायत समितीपर्यंत यावे लागते. याठिकाणी मातीचा प्रचंड भराव टाकण्यात आला आहे. मातीचा भराव टाकण्यासाठी येथे कंपनीच्या डंपरची सतत ये-जा सुरू असते. हे डंपर भरधाव वेगाने येतात. सोमवारी सकाळी एका दुचाकीला या डंपरची धडक बसली. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले.
दुचाकीचा अपघात फार मोठा नव्हता. त्यामुळे डंपरचालकाला समज देऊन सोडण्यात आले. मात्र, या उड्डाणपुलासाठी मातीचा भराव करण्यात आला आहे. या भरावावरून एखादे वाहन गेले की बेसुमार धुळ उडते. सायंकाळी येथे पाणी मारल्यानंतर रस्ता निसरडा होतो आणि अपघात होतात. त्यामुळे येथून ये-जा करणारी वाहने धीम्या गतीने चालतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पुलाच्या दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ते आहेत. मात्र, या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
कोट
पाग-बौद्धवाडी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या कायमची झाली आहे. खासगी वाहतूकदारांचा हा नेहमीचा मार्ग आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. येथे अंडरपास व्हावा, अशी मागणी आम्ही महामार्ग विभागाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्याची दखल कोणी घेतली नाही. त्यामुळे आम्हाला हा त्रास आता कायमचा झाला आहे.
- राजेश जाधव, पाग-बौद्धवाडी, चिपळूण
कोट
उड्डाणपुलाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी आहे. काम सुरू असताना थोडा त्रास होईल. आम्ही शक्य त्या उपाययोजना करीत आहोत. तरीही गैरसोय होत असेल तर नागरिकांनी सहकार्य करावे.
- श्याम खुणेकर, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.