26O29957
कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
काजू, आंबा पिकाची काळजी घ्या ; कृषी विद्यापीठाकडून सावधगिरीचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामानासह ‘उष्णतेची लाट’ येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जाहीर केला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसात सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे. या विचित्र हवामानाचा परिणाम आरोग्यावरच नव्हे तर बागायतीवरही होत आहे. वाढत्या तापमानामुळे आंबा आणि काजू पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणामुळे फळांची अकाली गळती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्य असल्यास प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. फळांची उन्हामुळे होणारी होरपळ रोखण्यासाठी आंबा फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालावे, तसेच नवीन कलमांच्या खोडांना ‘बोडो पेस्ट’ लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काजू, नारळ, सुपारी आणि चिकू बागेत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या बुंध्याशी पेंढा किंवा वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर झावळ्या गुंडाळाव्यात, तर नवीन लागवड केलेल्या रोपांना शेडनेटच्या साह्याने सावली करावी.
----
पशुधनाची विशेष काळजी घ्या
पशुधनाचे व्यवस्थापन करताना जनावरांना दिवसभर पुरेसे आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी पाण्यात गूळ आणि मीठ यांचे मिश्रण करून द्यावे. दुपारी तीव्र उन्हात जनावरांना चरण्यास बाहेर सोडू नये. कुक्कुटपालनामध्ये शेडचे तापमान कमी ठेवण्यासाठी छतावर गवत किंवा झावळ्यांचे आच्छादन करावे आणि पक्ष्यांना पुरेसे पाणी व खाद्य योग्य वेळी द्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग आणि कृषी विद्यापीठाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.