दर्जेदार बियाण्यांनी शाश्वत शेती
डॉ. रमेश कुणकेरकर ः शिरगावात भात, भुईमूग बिजोत्पादन प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : ‘कोकणातील शेती शाश्वत करण्यासाठी शुद्ध आणि दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. विद्यापीठाने विकसित केलेले विविध वाण आणि आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी स्वतःचे बियाणे तयार करून आर्थिक प्रगती साधू शकतात,’ असे प्रतिपादन दापोली कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर यांनी केले.
शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात अखिल भारतीय समन्वित बियाणे प्रकल्पांतर्गत ‘भात व भुईमूग बिजोत्पादन तंत्रज्ञान’ विषयावर आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. अशोककुमार चव्हाण, साहाय्यक बियाणे उत्पादन अधिकारी डॉ. बालाजी थोरात, प्रभारी अधिकारी डॉ. नीलेश सोनोने, डॉ. परेश पोटफोडे, डॉ. संतोष वानखेडे, प्रा. सचिन सनगरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट दिली. या वेळी रब्बी हंगामातील भात, भुईमूग आणि कारळा या पिकांच्या बीजोत्पादन प्लॉटची पाहणी करण्यात आली. डॉ. सोनोने यांनी केंद्रावर राबवल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांची आणि उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी डॉ. कुणकेरकर यांनी भात रोपवाटिका व्यवस्थापन आणि जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड यावर सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. चव्हाण यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी रासायनिक औषधांच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले.
ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांची निवड आणि बियाणे संकलनाच्या तांत्रिक बाबींची माहिती डॉ. बालाजी थोरात यांनी दिली. तसेच डॉ. परेश पोटफोडे व डॉ. वानखेडे यांनी भात व भुईमुगावरील रोगनियंत्रण आणि मित्रकीटकांच्या मदतीने कीड व्यवस्थापन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दिले. शिरगावचे प्रयोगशील शेतकरी सुहास चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांतील बीजोत्पादनाचा अनुभव मांडला. स्वरूप भाटकर यांनी सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी साहाय्यक राजेश सावंत, अजय जाधव, विजय सावंत आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----
पथनाट्यातून जनजागृती
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य. ‘ग्रामबिजोत्पादन’ या विषयावर त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. प्रा. सचिन सनगरे यांनी सामाजिक कामात विद्यार्थ्यांचा सहभाग नेहमीच राहील, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.