30231
सावंतवाडीत धूळ, कामांचा गोंधळ
संजू परब ः विकासाचे व्हिजन सांगणारे आता गायब
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः पाणी पुरवठा विभागाच्या नळपाणी योजनेचे काम तज्ज्ञ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू नाही. याबाबत सभागृहात आम्ही आवाज उठवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विकासाचे व्हिजन सांगणारे आता गायब आहेत आणि शहर धूळ खात आहे. हे सत्ताधाऱ्यांचे पाप असून येत्या आठ दिवसांत परिस्थिती न बदलल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी दिला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री. परब म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहरावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे शहरात सुरू असलेली नळ पाणी योजना आणि गॅस पाईपलाईनची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यासंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले आहे; मात्र यात काहीच बदल दिसत नाही. त्यामुळे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व आमदार नीलेश राणे यांना सोबत घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सुरू असलेल्या चुकीच्या कामाची माहिती देणार आहोत. तसेच कारवाईची मागणी करणार आहोत. गॅस पाइपलाईनमुळे शहरवासीयांना अक्षरशः धूळ खावी लागत आहे. जोपर्यंत निविदा निघत नाही, तोपर्यंत हे काम थांबवावे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होणार नाही. हे काम न थांबवल्यास कोणी कुठे कुठे बैठका घेतल्या ते नावानिशी जाहीर करू,’’ असा इशारा देखील श्री. परब यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
------------
संजू परब यांनी उपस्थित केलेले मुद्दे
- नळपाणी योजनेचे काम तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू नसल्याचा आरोप
- सभागृहात आवाज उठवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही
- शहरात सुरू असलेली नळपाणी योजना आणि गॅस पाइपलाईनची कामे चुकीच्या पद्धतीने
- माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार नीलेश राणे यांना सोबत घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार
- आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर रस्त्यावर उतरू
- सुरू असलेल्या कामांबाबत नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार व कारवाईची मागणी करणार
- निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम थांबवण्याची मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.