लोगो... जागतिक काचबिंदू जागृती सप्ताह
निदान, उपचाराने करा काचबिंदूवर मात
डॉ. ठाकूर ः जिल्ह्यात साडेअकरा हजारांहून अधिक रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : सध्या जागतिक काचबिंदू (ग्लॉकोमा) सप्ताह सुरू आहे. भारताचा विचार केला तर १०० पैकी पाच जणांना काचबिंदू आजाराने ग्रासले असून, रत्नागिरी जिल्ह्याची आकडेवारी पाहता हे प्रमाण ८ ते ९ असल्याचे गेल्या पाच वर्षांत दिसून आले आहे. इन्फिगो आयकेअर या हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांत एक लाख २० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ हजार ५०० जणांना ग्लॉकोमाचा विकार असल्याचे दिसून आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
जागतिक ग्लॉकोमा सप्ताह दरवर्षी ८ ते १४ मार्च या कालावधीत आयोजित केला जातो. ग्लॉकोमा हा डोळ्यांचा गंभीर आजार असून, त्याला अनेकदा ‘दृष्टीचा शांत चोर’ असे म्हटले जाते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे फारशी जाणवत नाहीत. हळूहळू डोळ्याच्या नसांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होत जाते आणि योग्य वेळी निदान न झाल्यास कायमस्वरूपी अंधत्वही येऊ शकते.
ग्लॉकोमा हा विकार आनुवंशिक आहे. त्यामुळे ज्या घरात आई-वडील किंवा आजी- आजोबांना ग्लॉकोमा असल्यास पुढच्या पिढीतील व्यक्तींनी योग्य वेळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्लॉकोमा होण्यामागे डोळ्यांतील दाब वाढणे, वय वाढणे, मधुमेह, कुटुंबात या आजाराचा इतिहास असणे, जास्त नंबरचा चष्मा किंवा दीर्घकाळ स्टेरॉईड औषधांचा वापर ही काही महत्त्वाची कारणे असू शकतात. विशेषतः ४० वर्षांवरील व्यक्तींनी नियमित नेत्रतपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त दृष्टी चांगली दिसते म्हणून डोळे पूर्णपणे निरोगी आहेत असे समजणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला डॉ. ठाकूर यांनी दिला.
जागतिक ग्लॉकोमा सप्ताहाचा उद्देश लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे. ‘लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित पाठपुरावा’ यामुळे दृष्टी सुरक्षित ठेवता येते म्हणूनच आपण स्वतः तपासणी करून घ्यावी आणि आपल्या कुटुंबीयांनाही डोळ्यांची नियमित तपासणी करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.
---
चौकट १
हे जरूर करा.
ग्लॉकोमा टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर तपासणी. डोळ्यांचा दाब मोजणे, ऑप्टिक नर्व्हची तपासणी, आवश्यक असल्यास व्हिज्युअल फील्ड किंवा ओसाटीसारख्या चाचण्या करून आजार लवकर ओळखता येतो. उपचारांमध्ये डोळ्यातील औषधी थेंब, लेझर किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश असू शकतो, असा सल्लाही डॉ. ठाकूर यांनी दिला.