‘युडीआयडी कार्ड
२३ पर्यंत जमा करा’
रत्नागिरी ः दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी कार्ड काढलेले नाही त्या लाभार्थ्यांनी २३ मार्चपर्यंत नवीन युडीआयडी कार्ड काढून ते ई-केवायसी करून तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजित गाताडे यांनी केले आहे. दिव्यांग लाभार्थ्याच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करून २ हजार ५०० इतके अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येत आहे. त्याकरिता लाभार्थ्यांचे ऑनलाईन युडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) डीबीटी पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे युडीआयडी व आधार संलग्नीकरण करण्याबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील २ हजार ९६८ लाभार्थी युडीआयडी व आधारशी संलग्न नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. या वेळी लाभार्थ्याची माहिती डीबीटी पोर्टलद्वारे अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी केलेले युडीआयडी कार्ड संजय गांधी योजना शाखेत जमा केलेले नाही त्यांनी ई-केवायसी केलेले युडीआयडी कार्ड तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावेत.
चिपळुणात मंगळवारी
उमेदवार भरती मेळावा
रत्नागिरी ः औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसाय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ उमेदवारीची संधी मिळावी म्हणून १७ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंतप्रधान शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे भगवान परशुराम शासकीय औ. प्र. संस्था, चिपळूण येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचनाकेंद्राद्वारे भगवान परशुराम शासकीय औ. प्र. संस्था चिपळूण यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण
यांना अभिवादन
रत्नागिरी ः महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
शासकीय, निमशासकीय सेवांत
खेळाडूंना पाच टक्के आरक्षण
रत्नागिरी ः राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ''क्रीडा ई-प्रमाण'' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. यासाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करून दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरित या द्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
सीए फाउंडेशन प्रवेशपरीक्षेत
खेडमधील ३ विद्यार्थी चमकले
खेड : चार्टर्ड अकाउंटन्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन प्रवेशपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील ३ विद्यार्थ्यांनी गुणांचा उच्चांक गाठून सीए प्रवेशपरीक्षेतील यशोगाथा कायम राखली आहे. सीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेसाठी सीए फाउंडेशनने परीक्षा घेतली होती. या परीक्षेकरिता संपूर्ण देशभरातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रविष्ट होत असतात. वाणिज्य शाखेतील १२वीच्या इशान लोकरे, जुईली पाटील, सलोनी दिवेकर या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर ४०० गुणांच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून सीए फाउंडेशन परीक्षेत यश संपादित केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. रूपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्नील पंडित, प्रा. अक्सा फोपलोणकर, प्रा. संतोष पाटील, प्रा. श्रद्धा थरवळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बिपिन पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रेया गुरवला ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण
खेड ः तालुक्यातील वेरळ येथील श्रीसमर्थ कृपा विश्वप्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) वेरळ येथील विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र ऑलिम्पियाड २०२५-२६ परीक्षेमध्ये ४थीमधील श्रेया गुरव हिने सुवर्णपदक, ५०० रुपये किमतीची भेटवस्तू आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र प्राप्त केले. तिने या यशामुळे व मेहनतीमुळे मौल्यवान अनुभव मिळवला आहे. तिला भक्ती घडशी हिचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्था शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. अली यांनी तिचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.