31050
पाडलोस रवळनाथ मंदिरात
धार्मिक कार्यक्रम उत्साहात
बांदा, ता. १५ : पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. यानिमित्त लघुरुद्र, होमहवन यांसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पाडलोस गावासह परिसरातील भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून, देवाचे दर्शन घेतले आणि धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान ओटी भरणे, केळी ठेवणे यांसारखे पारंपरिक विधीही करण्यात आले. सायंकाळी गावातील भजनी कलाकारांनी सादर केलेल्या भक्तिमय भजनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. रात्री ९ वाजता अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण (ता. वेंगुर्ले) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाला ग्रामस्थ व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.