31481
गॅस तुटवण्याचे म्हापणवर
सावट; केंद्रावर लांब रांगा
म्हापण, ता.१७ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता म्हापण पंचक्रोशीला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईने आता रौद्ररूप धारण केले आहे. म्हापण येथील गॅस वितरण केंद्रावर आज सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे, गुढीपाडवा जत्रोत्सव तोंडावर असतानाच ही टंचाई निर्माण झाल्याने गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे कच्च्या तेलासह गॅसच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. भारतात अनेक ठिकाणी गॅसची टंचाई जाणवू लागली असून म्हापण केंद्रावरही त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. सध्या गॅसचा पुरवठा मर्यादित असून, केंद्रावर एका वेळी केवळ ४० ते ४५ सिलिंडरचे वितरण होत आहे. रांगेत शेकडो ग्राहक असताना अत्यल्प वितरण होत असल्याने, तासनतास उभे राहूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक गॅसचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पुरवठा वेळेवर होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
--------
जत्रोत्सवाच्या तयारीवर विरजण
म्हापण पंचक्रोशीतील महत्त्वाचा मानला जाणारा ‘गुढीपाडवा जत्रोत्सव’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि नैवेद्याचे पदार्थ बनवण्यासाठी गॅसची नितांत गरज असतानाच ही धावपळ सुरू झाली आहे. ‘‘तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने सण कसा साजरा करायचा?’’ असा प्रश्न म्हापणमधील गृहिणी विचारत आहेत. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी म्हापणवासीयांकडून जोर धरू लागली आहे.