शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा
भारतीय किसान संघ; पिकविमा, सिंचन व्यवस्था सुधारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघातर्फे येत्या २५ मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आंबा-काजूपिकांचे नुकसान, पिकविमा, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि सिंचन व्यवस्थासारख्या कळीच्या मुद्द्यांवर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती जिल्हा मंत्री धनंजय जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय येथून मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. आंबा आणि काजूपिकाच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा करावी, या प्रमुख मागणीसह पीकविमा हप्त्यापासून ते ट्रिगर पॉईंटपर्यंतच्या तांत्रिक बाबीत सुधारणा करा, सुपारी व मसालापिकांनाही पिकविम्याचे संरक्षण द्या, मंजूर सोलरपंप तातडीने उभारा, सोलरपंपाची सक्ती न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंगल फेज किंवा थ्री फेज वीजजोडणी द्या, सोलरपंपाची सबसिडी थेट शेतकऱ्याला द्या, ‘भयमुक्त शेती’ करण्यासाठी शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा उपद्रव थांबवण्यावर ठोस उपाययोजना करा, ‘ई-पीक’ ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर करून त्यातून होणाऱ्या दुष्परिणामांपासून शेतकऱ्यांना दिलासा द्या, जिल्ह्यातील नादुरूस्त सिंचन प्रकल्पांची तातडीने दुरुस्ती करावी आणि नवीन जलस्रोत निर्माण करून सिंचन क्षमता वाढवा, अशा मागण्या शासनदरबारी करण्यात येणार आहेत.
----
चौकट
न्यायहक्कासाठी मोर्चा
कोकणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, शासकीय योजनांमध्ये आवश्यक बदल व्हावेत ही प्रमुख मागणी यात करण्यात आली आहे. ‘शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि न्यायहक्कासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन भारतीय किसानसंघाचे जिल्हा मंत्री जोशी यांनी केले आहे.