(ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
-rat१८p१८.jpg-
26O31771
रत्नागिरी ः कोकणात मार्च ते मे या तीन महिन्यात काजू बी विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होते.
------
कोकणचा काजू उद्योग हायटेक मार्गावर
रत्नागिरी, सिंधुदुर्गात अधुनिक प्रक्रिया केंद्र ; व्हिएतनामच्या धर्तीवर प्रयोग ; राज्य काजू परिषदेत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः कोकणचे ‘पांढरे सोने’ अशी ओळख असलेल्या काजूने आता जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य गाजवण्याची तयारी पूर्ण केली आहे. व्हिएतनाम आणि कंबोडियासारख्या काजू उत्पादनात अग्रेसर असलेल्या देशांच्या धर्तीवर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘फुल्ली ऑटोमॅटिक’ प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य काजू परिषद बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामुळे कोकणच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात क्रांती होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाला मजुरांच्या कमतरतेचा मोठा फटका बसत होता. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आधुनिक मशीनरीचा वापर केला जाणार आहे. ही यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय काजू प्रक्रियेचा दर्जा सुधारणार आहे. या कामासाठी सरकारने तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बाजारपेठेत योग्य भाव मिळेपर्यंत काजू साठवून ठेवण्यासाठी कोकणात गोदामांची मोठी कमतरता होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता ५०० ते ५ हजार मेट्रिक टन क्षमतेची भव्य गोदामे उभारली जाणार आहेत. त्यामुळे माल खराब होण्याच्या भीतीपोटी किंवा साठवणुकीअभावी शेतकऱ्यांवर कमी दरात माल विकण्याची वेळ येणार नाही.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेतले जाणार आहे. महिलांना या उद्योगात सक्षम करण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी उद्योगांना सौरऊर्जा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उत्पादन घेणे शक्य होईल.
------
‘काजू हब’च्या दिशेने वाटचाल
केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच नव्हे, तर आता पालघरमध्येही नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टीला एक मोठा ‘काजू हब’ म्हणून विकसित करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असून ‘मिशन मोड’वर काम सुरू झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भव्य साठवणूक क्षमता आणि सरकारी पाठबळ यामुळे कोकणचा काजू आता केवळ स्थानिक बाजारातच नाही तर सातासमुद्रापार आपली नवी ओळख निर्माण होऊ शकते.
-----
व्हिएतनाम मॉडेल काय आहे?
व्हिएतनाममध्ये काजू फोडण्यापासून ते प्रतवारी करण्यापर्यंत सर्व कामे मशिनद्वारे होतात. मानवी हातांचा स्पर्श कमीत कमी असल्याने उत्पादनाचा वेग प्रचंड असतो आणि स्वच्छता आंतरराष्ट्रीय दर्जाची राहते. कोकणातही आता हेच तंत्रज्ञान राबवले गेले तर त्याचा फायदा होऊ शकतो.
--
‘फुल्ली ऑटोमॅटिक’चे टप्पे
* स्टीम बॉइलिंग : कच्चा काजू बी वाफेवर शिजवण्यासाठी स्वयंचलित बॉयलरचा वापर होतो, ज्यामुळे काजूचा दर्जा एकसमान राहतो.
* ऑटोमॅटिक शेलिंग : पूर्वी हाताने किंवा साध्या मशिनने काजू फोडले जात. आता आधुनिक कटिंग मशिन तासाला शेकडो किलो काजू अचूकपणे फोडतात. यामुळे ‘पूर्ण गर’ मिळण्याचे प्रमाण वाढते.
* ड्रायर आणि पीलिंग : काजूचा लाल टरफल काढण्यासाठी ‘थर्मल ड्रायर’ आणि ‘न्यूमॅटिक पीलिंग मशिन’ वापरले जाते. यात हवेच्या दाबाने टरफल काढले जाते, ज्यामुळे काजूला डाग पडत नाहीत.
* कलर सॉर्टर : हे या यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचे मशिन आहे. काजूचा पांढरा रंग, आकार आणि दर्जा यानुसार हे मशिन लेझर सेन्सरच्या साहाय्याने काजूचे वर्गीकरण करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.