32164
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रुग्णवाहिकेतच कन्यारत्न
‘१०८’ टीमचे प्रसंगावधान; असह्य प्रसूती वेदनांमुळे तातडीने निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २० : हिंदू नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असतानाच, वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे एका चिमुकलीच्या आगमनाने आनंद द्विगुणित झाला आहे. ‘महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८’ च्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरुप प्रसूती झाली.
वायंगणी येथून एका गर्भवती महिलेसाठी सकाळी ८.२२ वाजता ‘१०८’ नियंत्रण कक्षाला आपत्कालीन कॉल आला. यावेळी वेंगुर्ले येथील रुग्णवाहिका नुकतीच गोवा-बांबुळी येथील सेवा बजावून परतली होती. वेळ न घालवता रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाली आणि अवघ्या ८ मिनिटांत, म्हणजेच ८.३० वाजता रुग्णापाशी पोहोचली. त्या गर्भवती मातेची प्रकृती अत्यंत गंभीर होती. प्रसूती कळा तीव्र असल्याने महिलेला रुग्णालयात हलवणे शक्य नव्हते. अशावेळी वेंगुर्ले येथील ईएमएसओ डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ आणि रुग्णवाहिका चालक साईसिद्धेश मेस्त्री यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या मदतीने ही प्रसूती यशस्वी पार पडली. मातेने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाचे वजन २.४ किलो आहे. प्रसूतीनंतर माता आणि बालकाला पुढील उपचारांसाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले. ‘वेळेवर मदत मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि बाळ सुरक्षित आहे. ‘१०८’ मधील डॉक्टर आणि चालकाचे आम्ही मनापासून आभार मानतो,’’ अशा शब्दांत रुग्णाच्या नातेवाईकांनी ऋण व्यक्त केले.
.........................
‘१०८’ रुग्णवाहिकेत आतापर्यंत ४४७ प्रसूती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेत प्रसूती होण्याची ही ४४७ वी घटना ठरली आहे. सण-उत्सवाच्या दिवशीही तत्परतेने सेवा बजावणाऱ्या या ‘देवदूतांचे’ संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात लक्ष्मी आल्याच्या भावनेने वायंगणी गावात आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.