32233
‘कृषी कोकण’ विकासाचे आश्वासक दालन
विलास सावंत ः बांद्यात ‘भाजीपाला-फळ विक्री’ केंद्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे काळाची गरज आहे. दलाल साखळी कमी करून शेतकरी आणि ग्राहकांना थेट जोडणारा हा उपक्रम भविष्यात एक आदर्श मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग फळ बागायदार शेतकरी संघाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन विलास सावंत यांनी केले.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथे ‘कृषी कोकण भाजीपाला व फळ विक्री केंद्र’ या दालनाचा उद्घाटन समारंभ उत्साहात झाला. शेतकऱ्यांना त्यांच्या भाजीपाला उत्पादनाला योग्य दर मिळावा, तसेच दलाल साखळी तोडण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, कृषी अधिकारी युवराज भुईंबर आदी उपस्थित होते.
श्वेता कोरगावकर यांनी, महिलांचा शेती व विक्री व्यवस्थेमध्ये वाढता सहभाग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दोडामार्ग व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केंद्र त्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे संजय देसाई यांनी सांगितले. सरपंच नाईक यांनी, ग्राहकांना कमी दरात ताज्या भाज्या उपलब्ध होणे आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे, या दोन्ही गोष्टी साध्य करणारा हा उपक्रम ग्रामविकासासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. स्थानिक पातळीवर अशा विक्री केंद्रांची संख्या वाढली, तर ग्रामीण अर्थचक्र अधिक सक्षम होईल, असे मत श्री. आगलावे यांनी व्यक्त केले. श्री. भुईंबर यांनी, शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती स्वीकारून उत्पादन वाढवावे आणि अशा विक्री केंद्रांच्या माध्यमातून थेट विक्रीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी संचालक नारायण गावडे, सीताराम गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.