32804
देवरूख शहर डासमुक्त करण्याचा संकल्प
नगरपंचायतीचा निर्धार; अत्याधुनिक यंत्रांची खरेदी
देवरूख, ता. २३ ः देवरूख शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपंचायतीने शहरात डासमुक्त मोहीम हाती घेतली आहे. तसेच डास निर्मुलनासाठी घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला असून, त्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामग्री खरेदीचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळापासून शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नगरपंचायतीने नियमित फवारणीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नगरपंचायत अत्याधुनिक ‘वॉटर स्प्रिंकलर कम जेटिंग मशिन’ आणि नवीन ‘फॉगिंग मशिन’ खरेदी करणार आहे. या यंत्रांमुळे केवळ साचलेल्या पाण्यातच नव्हे तर हवेतही जंतुनाशकांची प्रभावी फवारणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणि वर्षभर डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल.
देवरूख शहरातील स्वच्छतेचा कणा असलेल्या कचरा संकलन प्रक्रियेतही मोठे बदल केला आहे. सध्या नगरपंचायतीकडे कचरा संकलनासाठी जुन्या घंटागाड्या आहेत; परंतु तांत्रिक बिघाड आणि वाढत्या अंतरामुळे कचरा उचलताना अनेक अडचणी येत होत्या, हे लक्षात घेऊन ५ नवीन घंटागाड्या खरेदीचा नगरपंचायतीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक गल्ली आणि उपनगरात वेळेवर कचरा संकलन होऊन शहर कचरामुक्त राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक क्षमतेने चालवण्यासाठी नवीन कंपोस्टिंग मशिनही घेण्यात येणार आहे. या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून उच्च दर्जाची खतनिर्मिती केली जाईल ज्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भार कमी होण्यास मदत होईल, असे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.
चौकट
चिकन वेस्टवर प्रक्रिया प्रकल्प
देवरूख नगरपंचायत केवळ कचरा संकलनावरच थांबणार नसून, गोळा केलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणार आहे. चिकन वेस्ट (वाया गेलेले मांस) ही शहरापुढील एक मोठी समस्या आहे. या वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे.
कोट
देवरूखमधील नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. शहरात डासांचे प्रमाण वाढू नये आणि कचरा व्यवस्थापन शिस्तबद्ध व्हावे यासाठी अत्याधुनिक मशिनरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या गाड्यांमुळे कामात व्यत्यय येत होता तो आता नव्या घंटागाड्यांमुळे दूर होईल. नागरिकांनीही या मोहिमेत सहकार्य करून आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीला साथ द्यावी.
- मृणाल शेट्ये, नगराध्यक्षा, देवरूख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.