खाद्यतेलाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ
गृहिणींचे बजेट कोलमडले; आखाती युद्धाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे सावट आता राजापूर तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचले आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेला आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत तेलाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि आखाती देशांतील तणावामुळे आयातीवर परिणाम झाल्याने ही स्थिती ओढवली आहे.
सर्वसामान्यांसह हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे सूर्यफूल तेल प्रामुख्याने युक्रेनमधून आयात केले जाते; मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे ही आवक ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम किमतींवर झाला असून, सूर्यफूल तेल आता १७५ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे तर सोयाबीन तेलाचे दर १५५ रुपयांपर्यंत वधारले आहेत. पामतेलासह इतर आयात होणाऱ्या तेलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या दरवाढीमुळे हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे तर घराघरांतील गृहिणींचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढलेल्या असताना आता तेलाच्या भडकलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
दरम्यान, तेलाच्या वाढत्या दरासोबतच आता वजनातील घटीचाही फटका ग्राहकांना बसत आहे. पूर्वी एक लिटर वजनाची समजली जाणारी तेलाची पिशवी आता प्रत्यक्षात ७०० ते ८०० मिली लिटरची येत आहे. अनेक ग्राहक अज्ञानापोटी ही पिशवी ‘एक लिटर’ समजूनच खरेदी करत आहेत. दरवाढीसोबतच कमी वजनामुळे सर्वसामान्यांची दुहेरी फसवणूक होत असल्याचे चित्र राजापूर बाजारपेठेत दिसत आहे.
-------
कोट १
गेल्या काही दिवसांपासून तेलांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपयांची दरवाढ झाली आहे. आधीच तेलाच्या पिशव्यांचे वजन कमी झाल्याने तेलाचा जेवणासाठी पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत असताना आता दरही वाढले आहेत. त्यामुळे जेवणाचा लज्जतदारपणा वाढवायचा कसा? घरगुती किराणा खरेदीचे नियोजन कसे करायचे?
- सावित्री खाडे, गृहिणी
----
कोट २
युद्धामुळे तेलांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून, घाऊक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या तेलाच्या बॉक्सच्या दरामध्येही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराने तेल खरेदी करावे लागत असल्याने त्याबाबत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असले तरी तेलखरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.
- राकेश पाटील, व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.