रस्त्याचे काम मार्गी लावा,
अन्यथा उपोषण करणार
चराठे बौद्धवाडीवासीयांचा इशारा
सावंतवाडी, ता. २८ : चराठे येथील बौद्धवाडीतील (पंचशील नगर) रस्त्यासाठी मंजूर निधी ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावावे, अन्यथा १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले आहे.
निवेदनातील आशय असा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत ‘चराठे हरिजन वाडी ते ओटवणे रस्ता’ खडीकरण व डांबरीकरणासाठी ५ लाखांचा निधी २०२५ पासून मंजूर आहे. या कामाची वर्क ऑर्डर निघाली असतानाही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे काम अद्याप सुरू झाले नाही. विशेष म्हणजे, ज्या जागेत ग्रामपंचायत कार्यालय उभे आहे, ती जमीन बौद्ध समाजातील लोकांनी दिली आहे. १९७१ पासून या रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असूनही, या समाजाला रस्त्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागत आहे. २६ जानेवारी २०२३ ला देखील याच मागणीसाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागले होते. आता ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासन खाती परत वर्ग होणार आहे. वाडीत पक्का रस्ता नसल्याने आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही. भविष्यातील गरज ओळखून ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर केला; मात्र ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना निवेदने दिली आहेत. ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लागले नाही, तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सावंतवाडी पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गसमोर उपोषण करण्याचा इशारा तेथील विश्राम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव आणि शरद जाधव यांनी दिला.