33983
मुख्य सूत्रधार, साथीदारांना
तातडीने शोधून गजाआड करा
‘आप’, ‘राष्ट्रवादी’ची मागणी
कणकवली, ता.२८ : शहरातील शासकीय ठेेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खूनामागे अमर कदम याला ताब्यात घेण्यात आले असले तरी या खूनामागचा सूत्रधार वेगळाच असण्याची शक्यता आहे. हा सूत्रधार शोधून काढून त्याला गजाआड करा, अशी मागणी आप आणि राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आज करण्यात आली.
आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रूपेश जाधव यांच्यासह समीर आचरेकर, भाई जेठे, डी.डी.कदम, नितेश मेस्त्री आदींनी आज पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सुशांत दळवी यांच्या डोक्यात पाठीवर गोळ्या घालून त्यांचा केलेला खून ही दुदैवी घटना आहे. या घटनेत पोलिसांनी दळवी यांचा मुकादम अमर पवार याला मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. मात्र तो एकटा हे कृत्य करू शकणार नाही. या घटनेमागे वेगळा सूत्रधार आणि अन्य काही साथीदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून शोध घेऊन सूत्रधार अाणि साथीदारांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करावे.
सुशांत दळवी यांदी महिन्यापूर्वीच कणकवली पोलिसांत तक्रार करून आपल्या जिवास धोका असल्याची तक्रार दिली होती. यात मुंबईतील काही संशयितांची नावेही देण्यात आली होती. दळवी यांना सतत धमकी देऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न होत होता. त्याचाही तपास व्हायला हवा. अमर कदम याच्या माध्यमातून सुशांत दळवी यांना हत्येच्या घटनास्थळी आणण्यात आले. तेथे त्यांचा गोळी घालून खून करण्यात आला असावा अशीही शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.