कोकण

राजापूर शहर विस्ताराच्या उंबरठ्यावर

CD

34133
34134

सकाळ विशेष - लोगो
राजापूर नगर परिषद
34096
34095
34097
34098
राजापूर ः कोदवली पुर्नवसन भागामध्ये अशाप्रकारचे कचऱ्याचे ढीग साचलेले असतात.
------------

राजापूर शहर विस्ताराच्या उंबरठ्यावर
कोदवली, कोंढेतड, धोपेश्वरमधील भागांचा समावेश : उत्पन्न वाढल्यास निधीचे सिंचन, विकासाला वेग

राजापूर नगरपालिकेने हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या हद्दवाढीमध्ये शहरानजीकच्या कोदवली, कोंढेतड आणि धोपेश्‍वर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही भागांचा नगरपालिकेमध्ये समावेश होणार आहे. उंच-सखल अशी विचित्र भौगोलिक रचना, अर्जुना-कोदवली नद्यांना सातत्याने येणाऱ्या पुरामुळे निश्‍चित करण्यात आलेली पूररेषा, देवस्थान इनाम अन् गावठाण राखीव क्षेत्र आदी विविध कारणांमुळे राजापूर शहराचा विकास अन् विस्तार होण्यामध्ये मर्यादा येत आहेत. मात्र, हद्दवाढ झाल्यास त्याचा शहर विकासाला फायदा होणार आहे. त्यामुळे दीडशे पूर्ण करणाऱ्या राज्यातील मोजक्या नगरपालिकांच्या पंक्तीमध्ये बसणाऱ्या राजापूर पालिकेने हद्दवाढीच्या माध्यमातून टाकलेले सकारात्मक पाऊल निश्‍चितच राजापूर शहराच्या भविष्यातील विकास अन् विस्तारासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
--


दृष्टीक्षेपात राजापूर शहर आणि नगर पालिका

स्थापना ः १८७६
क्षेत्रफळ ः ६.१९ चौ. कि. मी.
नगरपालिका वर्ग ः क
नगराध्यक्ष ः १ (लोकनियुक्त)
नगरसेवकांची संख्या ः १) लोकनियुक्त - २० ब) स्विकृत- २
लोकसंख्या ः ९७५३ (२०११ ची जगणगणना)
---------------

कोणता भाग येणार राजापूर शहरामध्ये

राजापूर शहराची हद्दवाढ करताना त्यामध्ये कोदवली, धोपेश्‍वर आणि कोंढेतड ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही भाग अन् परिसर शहरामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुर्नवसन विभाग परिसर, कोंढेतड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोपेटेवाडीतील काही भागासह गाडगीळवाडी परिसर, धोपेश्‍वर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणारा रानतळे, चाफडेवाडी परीसर यांचा समावेश आहे.
-----------

विविध कारणांमुळे शहर विकासात मर्यादा

राजापूर शहराची उंच-सखल अशी भौगोलिक रचना असून खोलगट भागामध्ये शहराचा विस्तार झाला आहे. शहरवासीयांना पावसाळ्यामध्ये दरवर्षी अर्जुना-कोदवली नद्यांना येणाऱ्या पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरामध्ये पूररेषा निश्‍चित केलेली आहे. शहरातील कोदवली नदीपलीकडील काही भाग देवस्थान इनाम आणि गावठाण भागामध्ये येतो. पूररेषा, देवस्थान इनाम अन् गावठाण भाग राखीव क्षेत्रामध्ये येत असल्याने या राखीव क्षेत्रामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करण्यामध्ये मर्यादा येत आहेत. त्यामुळे नवीन बांधकाम करू इच्छिणारे अनेकजण नवीन बांधकामासाठी शहरालगतच्या म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामीण भागाला अधिक पसंती देतात. याचा आपसूकच शहर विकासाच्यादृष्टीने फटका बसतो. मात्र, शहरालगतचा ग्रामपंचायत हद्दीतील भाग शहरामध्ये आल्यास त्याचा शहरविस्तार अन् विकास होण्याला फायदा होणार आहे.
------------

मूळ रहिवासी शहरातील असूनही कोदवली ग्रामपंचायतीत रहिवासी

शहरातून वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांना पावसाळ्यामध्ये वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्या कालावधीमध्ये शहरातील बहुतांश भागातील लोकजीवन विस्कळित होते. त्यामुळे शासनस्तरावर सर्व्हेक्षण होवून शहरामध्ये पूररेषा निश्‍चित करण्यात आली. या पूररेषेमध्ये येणार्‍या लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी डेपोनजीकच्या भागामध्ये त्या लोकांचे पुनर्वसन केले आहे. पूररेषेतील लोकांना या ठिकाणी घरे बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. पुनवर्सन वसाहतीमधील लोक मूळ शहरातील रहिवासी असले तरी, पुनर्वसन वसाहत ही कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येत असल्याने ते कोदवली ग्रामपंचायतीतील रहिवासी म्हणून ओळखले जातात.
----------
घरपट्टी ग्रामपंचायतीमध्ये, पाणीपट्टी पालिकेत

पुनर्वसन वसाहत कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येत असल्याने या भागातील लोकांना घरे वा अन्य स्वरूपाच्या इमारतींच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. पर्यायाने या घरांच्या बांधकामांची घरपट्टी वा बांधकाम कर कोदवली ग्रामपंचायतीमध्ये जमा करावा लागतो. त्याचा फायदा ग्रामपंचायतीला होवून तिच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. या ग्रामस्थांची निवासस्थाने कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असली तरी, हे ग्रामस्थ मूळ पालिका हद्दीतील आहेत. शासनाने निश्‍चित केलेल्या शहरातील पूररेषेतील हे ग्रामस्थ रहिवासी असून त्यांचे कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुनर्वसन वसाहत तयार करून त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतर्फे या लोकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
-----------

विकासनिधीसाठी होणार फायदा

कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुर्नवसन वसाहतीप्रमाणे कोंढेतड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोपटेवाडीतील आणि धोपेश्‍वर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रानतळे, चापडेवाडी परिसराचा उत्पन्नाच्यादृष्टीने नगर पालिकेला फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या लोकसंख्येची भर पडून शहराच्या लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे. ज्याच्या फायदा लोकसंख्येच्या आधारे शासनाकडून मिळणार्‍या विविध योजनांमधील वाढीव विकासनिधी मिळविण्यासाठी नगर पालिकेला फायदा होणार आहे.
------------

उत्पन्नामध्ये होणार वाढ

पुनर्वसन वसाहतीमध्ये सुमारे दीड-दोन हजाराहून अधिक लोकसंख्या असून सुमारे १९० हून अधिक इमारती आहेत. यापैकी काही इमारतींचा लोक निवासासाठी, तर काहीजण व्यापारी वापरासाठी उपयोग करत आहे. व्यापारी वापरासाठी इमारतींमध्ये हॉटेल, दुकाने आदींचा समावेश आहे. या इमारतींचा कर ग्रामपंचायतीकडून आकारला जात असून त्यासाठी व्यापारी वापर आणि निवासासाठी वापर असा दर ठेवला आहे. या इमारती कराद्वारे कोदवली ग्रामपंचायतीला वार्षिक सुमारे १ लाख ७५ हजार ते दोन लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. कोदवली पुर्नवसनसोबतच धोपेश्‍वरचा रानतळे परिसर आणि कोंढेतड येथील धोपटेवाडीतील काही भाग शहरामध्ये समाविष्ट झाल्यास त्याचा फायदा पालिकेला होवून उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
-------------

लोकसंख्या वाढ होणार

२०११ च्या जनजगणेनुसार राजापूर शहराची ९ हजार ७५३ लोकसंख्या आहे. मात्र, गेल्या दीड दशकानंतर जनगणना झालेली नसल्याने शहराची सद्यस्थितीतील निश्‍चित लोकसंख्येचे चित्र स्पष्ट होत नाही. असे असले तरी, सद्यस्थितीमध्ये सुमारे १५ ते १६ हजार लोकसंख्या असल्याचे पालिकेच्या प्राथमिक सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. हद्दवाढीनंतर या लोकसंख्येमध्ये सुमारे पाच-सहा हजार लोकसंख्येची भर पडणार असून त्यातून, राजापूर शहराची सुमारे २० हजार लोकसंख्या होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहराच्या विकासासाठी लोकसंख्येवर आधारित शासनाकडून विविध योजनांमधून अनुदान दिले जाते. त्यातून, शहर विकासाला गती मिळते. मात्र, शहराची सध्या तुलमात्मक कमी लोकसंख्या असल्याने शासनाकडून विकासासाठीही कमी अनुदान मिळते. मात्र, हद्दवाढीनंतर होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा फायदा लोकसंख्या आधारीत अनुदान मिळण्यासाठी पालिकेला उपयोग होणार आहे.
----------

पुर्नवसन परिसर ः हक्काचे ‘इन्कम पॉकेट’

कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली पूर्वीच्या शहरातील लोकांची पुर्नवसन वसाहत मुंबई-गोवा महामार्गावर वसलेली आहे. या भागामध्ये विविध प्रकारची हॉटेल, दुकाने उभारलेली असून त्यामध्ये दरदिवशी लाखो रूपयांची उलाढाल होते. त्यातच, महामार्गालगत ही जागा असल्याने या भागातील जमिनींना ‘सोन्याचा भाव’ असून दरदिवशी त्यांच्या दरामध्ये वाढ होत आहे. इमारत कराद्वारे सद्यस्थितीमध्ये कोदवली ग्रामपंचायतीला प्रतिवर्षी सुमारे पावणे दोन लाख रूपयांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. पाणीपट्टीद्वारे नगर पालिकेलाही हजारो रूपये उत्पन्न मिळते. त्यामुळे पुर्नवसन वसाहत परिसर छोटा असला तरी, त्यामध्ये होत असलेल्या लाखो रूपयांच्या उलाढालींमुळे आणि तेथून मिळणार्‍या उत्पन्नामुळे या भागाची ‘इन्कम पॉकेटस्’ म्हणून ओळख आहे.
------------

ग्रामपंचायती ना हरकत प्रमाणपत्र देणार का ?

कोदवली पुर्नवसन भागामधील स्वच्छतेकडे कोदवली ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांकडून वेळोवेळी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. त्याच्यातून, या भागातील ग्रामस्थांनी नगर पालिकेमध्ये पुर्नवसन भागाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. राजापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्ताव मंजूरीमध्ये ज्या भागातील लोकांचा राजापूर शहरामध्ये समावेश केला जाणार आहे त्या भागातील लोकांची अन् ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग कमी होवून शहरामध्ये समाविष्ट होणार असल्याचा राजापूर शहराला फायदा होणार असला तरी, ग्रामपंचायतीला त्याचा फटका बसणार आहे. त्यामध्ये लोकसंख्या आणि कर माध्यमातून उत्पन्न घटणार असल्याने कोदवली, धोपेश्‍वर आणि कोंढेतड ग्रामपंचायत हद्दवाढीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देणार का? ही बाब महत्वपूर्ण ठरणार आहे.
----------

नागरी सुविधा देण्याचे आव्हान

धोपेश्‍वर-चाफडेवाडी वगळता कोदवली पुर्नवसन विभाग, कोंढेतड धोपटेवाडी विभागाला नगर पालिकेकडून पाण्याची सुविधा दिली जाते. हद्दवाढीनंतर भविष्यामध्ये चाफडेवाडीलाही पालिकेकडून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. पाण्याच्या सुविधेसोबत पथदिवे यांसह अन्य मूलभूत नागरी सुविधा हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या भागातील लोकांना नगर पालिकेला द्याव्या लागणार आहेत. हद्दवाढीद्वारे नव्याने समाविष्ट होणाऱ्या लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे.
---------

नगरपालिकेचे फायदे ः

शहराची हद्दवाढ होणार
लोकसंख्या वाढणार
घरपट्टीसह अन्य विविध स्वरूपाच्या करांद्वारे उत्पन्नात वाढ
लोकसंख्येच्या निकषावर मिळणाऱ्या अनुदात होणार वाढ
नव्याने उभारल्या जात असलेल्या व्यापारी इमारतींमधील कराद्वारे भविष्यात उत्पन्नात भर
शहर विकास अन् विस्ताराला मिळणार चालना
---------

ग्रामपंचायतींचे तोटे

उत्पन्नामध्ये होणार घट
पूर्वीची ग्रामपंचायत हद्द घटणार
लोकसंख्या कमी होणार
लोकसंख्या निकषावर मिळणारे शासकीय योजनांवरील अनुदानाची रक्कम घटणार
-------------

कोट
शहराची उंच-सखल अशी भौगोलिक रचना, पूररेषा, देवस्थान इनाम अन् गावठाण भाग आदी विविध कारणांमुळे शहर विकास अन् विस्तार होण्यामध्ये मर्यादा येत आहेत. नवीन बांधकामामध्येही अडथळे येत आहेत. मर्यादित लोकसंख्येमुळे नगरपालिकेला मिळणारा निधी वा अनुदान तुलनात्मकदृष्ट्या कमी मिळते. शहरातील रहिवासी असलेले मात्र, पुर्नवसन भागामध्ये राहत असलेल्या लोकांनीही पालिकेमंध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील काही भागातील लोकांना पालिकेकडून पाणीपुरवठासारख्या सुविधा दिल्या जात आहेत. या साऱ्याचा विचार करून शहरालगतच्या कोदवली, धोपेश्‍वर, कोंढेतड या गावांमधील काही भाग घेवून राजापूर पालिकेची हद्दवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दवाढ झाल्यास त्याचा शहरविकास अन् विस्तारासाठी निश्‍चितच फायदा होईल.
- अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्षा, राजापूर नगरपालिका
---
कोट
शहरालगतच्या गावांमधील काही भाग घेवून राजापूर नगरपालिकेची हद्दवाढ करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये धोपेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग घेण्याचा नगरपालिकेचा मानस असल्याचे समजते. मात्र, त्याबाबत नगर पालिककेडून ग्रामपंचायतीशी अद्याप कोणताही अधिकृत पत्रव्यवहार झालेला नाही. नगर पालिकेकडून भविष्यामध्ये हद्दवाढीसंबंधी पत्रव्यवहार झाल्यास राजापूर नगरपालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याबाबत ग्रामपंचायत परिसरातील लोकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेवून ग्रामस्थांच्या भूमिकेनुसार नगरपालिका हद्दवाढीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाईल.
- उमेश शिवगण, प्रशासक, धोपेश्‍वर

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT