swt3011.jpg
34314
दीपक तारी
पुरवणी डोके मा. दीपक तारी सेवानिवृत्ती विशेष
शैक्षणिक क्षेत्रातील तेजस्वी ''दीपक''
लीड
''दीपक'' नावाला सार्थ ठरवणारे आदर्श शिक्षक दीपक नारायण तारी यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-आरोसबाग या निसर्गरम्य गावात जन्मलेले दीपक तारी हे खऱ्या अर्थाने आपल्या नावाप्रमाणेच ''दीपक'' ठरले. स्वतः जळून इतरांच्या जीवनात प्रकाश पसरवणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली. ग्रामीण भागात त्यांनी दीर्घकाळ प्रभावीपणे अध्यापन कार्य केले. हिंदी भाषा वृद्धीसाठी जिल्हाभर काम उभे केले. विविध संघटनांमध्येही ते कायम सक्रिय असतात. ३० वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर ते वसोली येथील यशवंत राघोजी परब विद्यालय येथून मंगळवारी (ता.३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त...
- प्रकाश तेंडोलकर
.................
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीपक तारी यांच्या आयुष्यात लहानपणीच कठीण प्रसंग आले. चार भाऊ आणि एक बहीण यांमध्ये सर्वात लहान असलेल्या दीपक यांचे अवघ्या आठव्या वर्षी पितृछत्र हरपले. या कठीण प्रसंगी त्यांच्या आईने अपार धैर्य, जिद्द आणि स्वावलंबनाच्या बळावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. आईचे कष्ट, संस्कार आणि चिकाटी हीच त्यांच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी ठरली. या काळात त्यांच्या काका-काकूंनीही कुटुंबाला आधार दिला.
लहानपणापासूनच शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी दृढ केले होते. ''मी मोठा होऊन शिक्षक होणार'' हा निर्धार त्यांनी कृतीत उतरवला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आरोसबाग क्रमांक २ येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. या काळात मुख्याध्यापक एम. डी. देसाई तसेच इंग्रजी विषयाचे शिक्षक शरदचंद्र महाबळ यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या असताना महाबळ सरांनी स्वतः कर्ज काढून त्यांना मदत केली, ही घटना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत प्रेरणादायी ठरली. गुरु-शिष्य नात्याचे हे विलक्षण उदाहरण त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरले.
पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी १९९५-९६ मध्ये मिरज येथील अंबाबाई तालीम संस्थेतून बी.पी.एड. पदवी प्राप्त केली. शिक्षणाबरोबरच कबड्डी, खो-खो व अॅथलेटिक्समध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले.
२ ऑगस्ट १९९६ ला कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत राघोजी परब विद्यालय, वसोली येथे त्यांनी शिक्षकी सेवेला प्रारंभ केला आणि खऱ्या अर्थाने श्री. तारी यांनी लहानपणी उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले. श्री. देसाई तसेच श्री. महाबळ यांच्या प्रेरणेमुळे व खंबीर आर्थिक पाठबळामुळेच आपले स्वप्न पूर्ण करू शकले. आपल्या ३० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे कार्य अत्यंत निष्ठेने केले. हिंदी विषयावरील प्रभुत्व, सोप्या भाषेत अध्यापन करण्याची शैली आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले.
सामाजिक कार्य सुरू असताना त्यांनी आपल्या शालेय कामकाजाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. स्वतः एक उत्कृष्ट क्रीडापटू असणाऱ्या श्री. तारी यांनी उत्तम खेळाडू घडविले. सरांचे अनेक विद्यार्थी उंच उडी व गोळाफेक या क्रीडा प्रकारांत राज्यस्तरावरही चमकले. या प्रवासात संस्था अध्यक्ष यशवंतराव परब, सध्याचे चेअरमन श्रीकृष्ण परब, मुख्याध्यापक अजित परब तसेच सहकारी शिक्षक (कै.) देसाई, श्री. वारंग, श्री. कोकितकर व कर्मचाऱ्यांचे त्यांना सातत्याने सहकार्य लाभले.
हिंदी विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत १९९७ पासून ते जिल्हा हिंदी विषय मंडळाशी संलग्न झाले. २०११ पासून ते सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळाचे सक्रिय उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
कॉलेज जीवनात ''छात्र भारती'' संघटनेचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. त्यांचे कॉलेज जीवनातील मित्र व ''शिक्षक भारती'' संघटनेचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांच्या सहवासातून त्यांना संघटनात्मक कार्याची प्रेरणा मिळाली. २०११ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री. वेतुरेकर यांनी ''शिक्षक भारती''ची स्थापना केल्यानंतर त्यांनी संघटनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम सुरू केले आणि आज ते शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मुळातच परोपकारी, मनमिळाऊ आणि मदतीस तत्पर असलेला त्यांचा स्वभाव त्यांना समाजात विशेष स्थान मिळवून देतो. कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदतीसाठी ते तत्परतेने धावून जातात. पोलिस स्टेशनपासून ते तहसील कार्यालयापर्यंत, कुठल्याही स्तरावर ते लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळेच ते समाजातील ''आपला माणूस'' म्हणून ओळखले जातात.
त्यांचा मित्रपरिवारही अत्यंत मोठा आहे. मित्र जोडत जाणे हा जणू त्यांचा छंद. "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस" म्हणजे दीपक नारायण तारी असा मित्रपरिवार त्यांनी जोडला आहे. शालेय जीवनापासूनच त्यांनी मित्र जोडले आणि मैत्री जोपासली. कुणा एका मित्राचे नाव घेणे म्हणजे दुसऱ्यावर अन्याय होईल, एवढा मोठा मित्रांचा गोतावळा त्यांच्याकडे आहे! तरीसुद्धा एका नावाचा उल्लेख करावाच लागेल, त्यात त्यांचे जिवलग मित्र भानुदास दळवी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. लहानपणापासूनची ही मैत्री आजही तितक्याच दृढतेने टिकून आहे.
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यात डॉ. हरिवंशराय बच्चन स्मृती राज्यस्तरीय भाषारत्न पुरस्कार (२००६), सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार (२०१४-१५), (कै.) वसंतशेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१९) तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा विशेष सन्मान (२०२०) हे त्यांपैकी उल्लेखनीय सन्मान होत. याच सेवाकाळात कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीमध्ये २०२२ ते २०२७ करिता संचालक म्हणून त्यांची निवड झाली. पतसंस्थेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. मुंबई हिंदी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
पत्रकार म्हणूनही त्यांनी २००० पासून कार्य करत समाजप्रबोधनाची धुरा सांभाळली. शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय समतोल साधला आहे.
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी सौ. दिव्या तारी यांची त्यांना लाभलेली साथही तितकीच मोलाची आहे. त्यांच्या पाठबळामुळेच त्यांनी हे कार्य अधिक सक्षमपणे पार पाडले. ते मंगळवारी ३० वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत आहेत. तथापि, ''दीपक'' कधीच विझत नाही... तो सतत प्रकाश देत राहतो. दीपक सरांनी आपल्या ज्ञानाचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या जीवनात पसरवला आहे.
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड समाजसेवेची प्रेरणा लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! खऱ्या अर्थाने ''दीपक'' नावाला सार्थ ठरवणारे हे व्यक्तिमत्त्व समाजात सदैव प्रकाश देत राहो!
- पुरवणी संकलन ः नीलेश मोरजकर
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.